हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा
५ लाख रुपयांच्या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ; जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार
जळगाव : इंद्रप्रस्थ नगरातील एका विवाहितेचा पती आणि सासरच्यांनी मिळून हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार समोर आली आहे. विवाहानंतर काही काळातच पतीने किराणा दुकान सुरू करण्यासाठी पाच लाख रुपये माहेरहून आणावेत, अशी मागणी केली. त्या मागणीला विरोध केल्याने विवाहितेला शिवीगाळ, मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री देवेंद्र सोनवणे (वय २४, रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) यांचा विवाह रितीरिवाजानुसार देवेंद्र बाळू सोनवणे (रा. बामणोद, ता. यावल) याच्याशी झाला होता. लग्नात दिलेला हुंडा अपुरा असल्याचा मुद्दा काढून सासरच्या मंडळींनी सतत त्रास द्यायला सुरुवात केली. पती देवेंद्रने किराणा दुकान सुरू करण्यासाठी पाच लाख रुपये माहेरून आणण्याची मागणी केली.
यासंदर्भात नकार दिल्याने गायत्री हिला सासरी शिवीगाळ करत वारंवार मारहाण केली गेली. तिची सासू संगीता सोनवणे, चुलत सासरे राजेंद्र सोनवणे, नणंद उज्ज्वला तायडे आणि नंदोई भाई तायडे यांनी देखील तिला मानसिक त्रास दिला. परिस्थिती असह्य झाल्यामुळे विवाहितेला सासरीून माहेरी परतावे लागले.
शेवटी ६ जुलै रोजी गायत्रीने जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार, वरील पाचही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रफुल्ल धांडे करीत आहेत.