अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल जाहीर
इंधनपुरवठा खंडित झाल्यामुळे दोन्ही इंजिन ठप्प
अहमदाबाद | १२ जून रोजी अहमदाबाद येथे घडलेल्या एअर इंडिया विमान अपघाताबाबत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने प्राथमिक चौकशी अहवाल जाहीर केला आहे. या भीषण दुर्घटनेत २६० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अहवालात अपघातास कारणीभूत ठरलेल्या प्राथमिक घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे.
प्रकाशित १५ पानांच्या अहवालानुसार, उड्डाणानंतर काही सेकंदांतच विमानातील दोन्ही इंजिनांनी कार्य करणे थांबवले. विमानाच्या फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि इतर तांत्रिक तपशीलांच्या आधारे हे निष्पन्न झाले की, इंजिनांना इंधनपुरवठा थांबल्यामुळे ही स्थिती उद्भवली. या तांत्रिक अडथळ्यामुळे विमान ताब्यात ठेवणे अशक्य झाले आणि ते थेट विमानतळाजवळील वैद्यकीय वसाहतीत कोसळले.
अहवालात रॅम एअर टर्बाइन (RAT) प्रणालीमध्ये बिघाड झाल्याचेही संकेत देण्यात आले आहेत, ज्याचा परिणाम वीजपुरवठ्यावर झाला. ही बाब घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांद्वारे स्पष्ट झाली आहे.
एअर इंडिया कंपनीने याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “आम्ही AAIB तसेच इतर संबंधित यंत्रणांशी पूर्ण समन्वय ठेवून सहकार्य करत आहोत. तपास प्रगतीपथावर असून आमच्याकडून आवश्यक ते सर्व पाठबळ दिले जात आहे.”