दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात
निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती; टप्प्याटप्प्याने होणार मतदान प्रक्रिया
नाशिक : राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया दिवाळीच्या नंतर, म्हणजे ऑक्टोबर अखेरीस सुरू होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. नाशिकमध्ये आयोजित निवडणूक आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चार महिन्यांत निवडणुका घेणे बंधनकारक असून, त्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने राबवला जाणार आहे. नाशिक विभागात सुमारे ५० लाख मतदार, ४,९८२ मतदान केंद्रे असून, १७,००० पेक्षा अधिक मतदान यंत्रांची गरज भासणार आहे. एकत्रित निवडणुका घेतल्यास मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची अडचण होऊ शकते, त्यामुळे टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्याचा निर्णय झाला आहे.
आरक्षण आणि प्रभाग रचना
एससी-एसटी आरक्षण निश्चित असून, ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार लॉटरी पद्धतीने आरक्षण ठरवले जाईल. १ जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार यादीच्या आधारे ही निवडणूक होणार आहे. प्रभाग रचना पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
व्हीव्हीपॅट यंत्रे वापरात नाहीत
या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट (VVPAT) यंत्रे वापरण्यात येणार नाहीत, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले.
एकंदरीत, दिवाळीनंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे आणि निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.