DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जैन हिल्स वर पोळा उत्साहात

 

 

  • विदेशी नागरिकांसह भूमिपुत्रांनी धरला ठेका, आदिवासी होळी नृत्य ठरले लक्षवेधी
  •  ‘शौर्यवीर’ ढोलताशा, संबळ वादकांचे आकर्षण

 

 

जळगाव | प्रतिनिधी

आदिवासी पारंपारिक देवदानी होळी नृत्य… शौर्यवीर ढोलताशांचा कडकडाट… संबळ वाद्यावर सालदारांचे नृत्य… सनई-चौघाड्यांच्या वाद्यासह.. सर्जा-राजा म्हणजे कृषीसंस्कृतीते मोलाचे स्थान असलेल्या वृषभ राजाची निघालेली भव्य मिरवणूक ही जैन हिल्सवरील पोळाचे पारंपारिक महत्त्व अधोरेखित करीत होती. या पोळा उत्सवात विदेशी विद्यार्थ्यांसह भुमिपुत्रांनी ठेका धरला. वृषभ राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरातील मान्यवर व शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पोळा फोडण्याचा मान जैन हिल्स येथील सालदार गडी हंसराज जाधव यांनी सलग तिसऱ्यांदा मिळवून हॅट्रीक साधली. त्यांचा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

 

जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेडच्या कृषी संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत जैन हिल्सच्या कृषि विभागातर्फे आयोजित पोळा उत्सवाप्रसंगी प्रथमत: अशोक जैन  व सौ. ज्योती जैन यांच्यासह जैन परिवाराच्या हस्ते वृषभराजाचे पुजन करण्यात आले. जैनहिल्स येथील श्रद्धा ज्योत या श्रद्धेय मोठेभाऊ भवरलालजी जैन यांचे स्मृतिस्थळ येथे ही मिरवणूक पोहोचून तेथे भाऊंच्या स्मृतिंना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सवाद्य मिरवणूक हेलीपॅडच्या मैदानात रवाना झाली. याप्रसंगी संघपती दलिचंद जैन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, राजेंद्र मयूर, डॉ. शेखर रायसोनी, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, माजी महापौर विष्णू भंगाळे, क्रेडाईचे अध्यक्ष अनिष शहा, सामाजिक कार्यकर्ते युसूफ मकरा,  सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, अॅड. जमिल देशपांडे, स्वरुप लुंकड, पारस राका, ज्येष्ठ समाजसेवक शिवराम पाटील, माजी नगरसेवक अमर जैन, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या डीन प्रो. गीता धरमपाल, अनुभूती स्कूलचे विद्यार्थी, गांधी रिसर्च फाउंडेशनचे डिप्लोमाचे विद्यार्थी, पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिकांची उपस्थिती होती. जैन हिल्सवर गत २८ वर्षांपासून साजरा होणाऱ्या पोळ्याच्या क्षणचित्रांचे छायाचित्रे असलेल्या पार्श्वभूमिवर सजावट केलेले भव्य मंडप व व्यासपीठ उभारण्यात आले होते.

 

‘यांत्रिकीकरण कितीही होवो परंतु भारतीय शेतीमध्ये वृषभ म्हणजे बैलांशिवाय शेती शक्य नाही. वृषभाचे महत्त्व यापुढेही अबाधित राहणार आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी २८ वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करणे सुरू केले. नव्या पिढीच्या प्रतिनिधींना ही भारतीय कृषि संस्कृती अनुभवता यावी, त्याचे महत्त्व समजावे या हेतुने शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हा उत्सव पाहण्यासाठी बोलावले जाते. बैल पोळा असे म्हणण्याऐवजी हा ‘वृषभ पूजन दिवस’ या अर्थाने रुढ व्हावा.’ असे मत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना व्यक्त केले.

 

 

मान्यवरांच्या हस्ते सालदारगडींचा सपत्नीक सन्मान
जैन इरिगेशनच्या कृषी विभागाचे काम विविध साईटवर चालते. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी, वर्षभर शेतात राबणाऱ्यांचा सन्मान करण्याची प्रथा श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंनी सुरू केली आहे. त्यात कंपनीच्या जैन हिल्स बॉटम, गोशाळा, जैन वाडा, जैन व्हॅली व्ह्यू, ५०० एकर, जैन रेसिडेन्सी ६० एकर, जैन डिव्हाईन पार्क, जेआरसी वैजनाथ साईट, जैन सोसायटी शिरसोली यांचा समावेश आहे. २८ सालदार गडी आणि ३० हून अधिक बैलजोडी काळ्या मातीमध्ये राबत असते. त्या सर्व सालदारगडींचा भेटवस्तु देऊन सपत्नीक गौरव करण्यात येतो. पोळ्याच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अशोक जैन, ज्योती जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, संजय सोनजे, विजयसिंग पाटील, डॉ. कल्याणी मोहरीर, प्रो. गीता धरमपाल आदी मान्यवरांच्याहस्ते गौरव झाला. किशोर कुळकर्णी व संजय सोनजे यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

आदिवासी नृत्य..विद्यार्थ्यांचा जल्लोष
डोक्यावर बांबू व मोर पीसाचा टोप.. कंबरेवर घुगंरूचा पट्टा बांधून विशिष्ट पद्धतीने मांदल, ढोलकी, तुडतुडी, थाळी, तुमळी, टिमकीवर बुध्या, बावा काली मिरक्या आदिवासी देवदानी नृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शौर्यवीर ढोल पथकातील १२० युवक-युवतींचे तालबद्ध वादन आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचे आदिवासी नंदिनृत्यावर अनुभूती निवासी स्कूल आणि अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. सालदारांनीही संबळावर नृत्याविष्कार सादर करुन आनंद व्यक्त केला. पारंपारिक भोजनाचा आस्वाद घेतला.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.