जळगाव दूध संघाच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर मंगेश चव्हाणांनी केलं पहिलं ‘हे’ काम
तब्बल सात वर्षे एकनाथ खडसे गटाची सत्ता होती...
जळगाव: जळगाव जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (चाळीसगाव) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमनपदाची सूत्रे सांभाळताच त्यांनी चेअरमनाच्या दालनात असलेला माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांचा फोटो हटविला.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या चेअरमन निवडीसाठी आज संचालक मंडळाच्या सभागृहात सकाळी नऊ वाजता पार बैठक आयोजित करण्यात आली होती. पिठासीन अध्यक्षपदी जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई होते. अध्यक्षपदासाठी भाजप-शिदें गटाचे संचालक आमदार मंगेश चव्हाण यांचा एकमेव अर्ज आला. सूचक संजय पवार तर अनुमोदक अरविंद देशमुख होते. एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी मंगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड घोषित केली.
महाविकास आघाडीच्या पाच सदस्यपैकी आमदार अनिल पाटील हे गैरहजर होते. तर शिंदे-भाजप गटाचे सर्व १५ संचालक उपस्थित होते. तर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलही उपस्थित होते.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-भाजप गटाचे तब्बल १६ संचालक निवडून आले होते. तर एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी गटाचे केवळ चार संचालक निवडून आले होते. तब्बल सात वर्षे एकनाथ खडसे गटाची सत्ता होती.
एकनाथ खडसेंचा फोटो हटविला…
जिल्हा दूध संघाच्या नवनियुक्त संचालक मंडळाची सभा झाली. चेअरमन निवडीनंतर मंगेश चव्हाण यांच्या दालनात असलेला माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा फोटो हटविण्यात आला. आमदार चव्हाण हे खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा पराभव करून निवडून आले होते. जिल्हा दूध संघावर एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली सात वर्षे सत्ता होती. याबाबत बोलतांना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, त्याठिकाणी त्यांच्या फोटोची गरज नाही, त्यामुळे आम्ही तो फोटो हटविला. त्याठिकाणी आम्ही आमचाही कोणाचा फोटो लावणार नाही.
पारदर्शक कारभार करणार: मंगेश चव्हाण
चेअरमनपदी निवड झाल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला यावेळी बोलतांना ते म्हणाले की, संघात अत्यंत पारदर्शीपणे काम करण्यात येईल. संघाची आजची स्थिती काय आहे?याची वस्तुस्थिती आपण आठ दिवसात सर्वासमोर मांडणार आहोत.संघ राज्यात अव्वल क्रमांकावर राहिल असे चागंले काम आपण करणार आहोत. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तसेच सर्व सदस्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून चेअरमनपदावर नियकुती केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.