अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी होईल – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
जळगाव : ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल ७२ वर्षांनंतर जळगाव जिल्ह्यात होत आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आयोजक संस्था असलेल्या मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर यांच्याकडून आलेल्या सुचनांवर काम करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे हे संमेलन यशस्वी होईलच, असा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज व्यक्त केला. या साहित्य संमेलनात वाचक, साहित्यिक, प्रकाशक व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
९७ वे मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. या निमित्ताने आयोजक संस्था असलेल्या मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांच्यासह मंडळाचे सदस्य शामकांत भदाणे, रमेश पवार, नरेंद्र निकुंभ, बजरंग अग्रवाल, राजेंद्र भामरे, शाम पवार, अमळेनरचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली.
साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीतूनच पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन तसेच मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांना फोन लावून सविस्तर माहिती दिली. निधीसह संमेलनस्थळी प्रशासनाच्यावतीने पुरविण्यात येणाऱ्या सुविधांविषयी आयोजकांना आश्वस्त केले. हे संमेलन भुतोनोभविष्यती यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्हाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा : डॉ.अविनाश जोशी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सोबत आज आमची खूप सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. कार्यक्रमस्थळी लागणाऱ्या सुविधांबद्दल जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतांना आम्ही आमच्या अडचणी व अपेक्षा सांगितल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर तात्काळ संबधितांना सुचना दिल्या. या बैठकीला अमळनेरचे प्रातांधिकारी देखील उपस्थित होते. यामुळे आजची चर्चा खूपच चांगली झाली, अशी प्रतिक्रिया मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी दिली.