जिल्ह्यातील १७ अमृत कलश जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना
जळगाव;- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानात जळगाव जिल्ह्यातील स्वयंसेवकांसोबत जिल्ह्यातील १७ अमृत कलश जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना करण्यात आले. मुंबईच्या आझाद मैदान येथे दि.२७ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व अमृत कलशांचे पूजन होईल व त्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा.रक्षा खडसे, खा.उन्मेष पाटील, आ.संजय सावकारे, आ.राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, DRDA प्रकल्प अधिकारी राजेन्द्र लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, अजय चौधरी, जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, जिल्हा युथ लीडर तेजस पाटील तसेच सर्व तालुक्यांचे बिडीओ उपस्थित होते. जिल्ह्यातील १५ पंचायत समिती, १ महानगरपालिका व सर्व नगरपालिका मिळून १ असे १७ अमृत कलश बुधवारी सायंकाळी नेहरू युवा केंद्राच्या ३० स्वयंसेवक आणि एका मार्गदर्शकासह मुंबईकडे रवाना झाले. मुंबईच्या आझाद मैदान येथे दि.२७ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व अमृत कलशांचे पूजन होईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर अमृत कलश दिल्लीसाठी रवाना होतील. ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानामध्ये अमृत कलशाच्या माध्यमातून जिल्ह्यातून एकत्र केलेली माती दिल्ली येथील कर्तव्यपथावर उभारण्यात येत असलेल्या अमृत महोत्सव स्मारकातल्या अमृत वाटिकेत अर्पण केली जाईल.