DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात

जळगाव :  ‘कौटुंबिक मूल्ये: प्रेम, आदर आणि एकतेचा पाया’ या विषयावर अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. एकत्र येण्याची भावना, सामायिक मूल्यांचा स्वीकार करुन संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचे स्मरण केले गेले. अनुभूती शाळेची संस्कृती, सर्जनशीलतेसह नैतिकता विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांमधून दिसून आली.

भवरलालजी जैन यांच्या स्मृतींना समर्पित ‘फाउंडर्स डे’ च्या सुरवातीला अनुभुती बालनिकेतनच चिमुकल्यांनी सरस्वती वंदना सादर केली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. अनुभूतीच्या ॲम्पी थिएटर मध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ॲड. सुशील अत्रे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन परिवारातील जेष्ठ सदस्य गिमी फरहाद, अनुभूती स्कूलचे चेअरमन अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबासिस दास यांचे सह सौ. ज्योती जैन, सौ. शोभना जैन, डॉ. भावना जैन, अंबिका जैन यांची उपस्थिती होती.

भारतीय सांस्कृतिक वारसा जपणारी आणि जागतिक दृष्टीवर आधारित अद्वितीय अशी अनुभूती निवासी शाळा आहे. यातील विद्यार्थ्यानी तबला, बासरी, गिटार या वाद्यांवर फ्युजन सादर केले. मान्यवरांच्या उपस्थितीत ‘अंकुरानुभूति’ व ‘संदेशानुभूति’ नियतकालिकाचे प्रकाशन झाले. त्यांच्या सोबत 2016 व 2018 चे विद्यार्थी उपस्थित होते. अनुभुती स्कुल ही शाळा नसुन एक कुटुंब आहे असे माजी विद्यार्थी आकांक्षा असनारे व तुषार कावरे यांनी मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना कला विभागातील विद्यार्थ्यांनी कौटुंबिक मुल्यावर सचित्र पेटिंग साकारले.

आरंभी म्युझिकल योग आणि संगीत यांचे उत्तम सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. गीत गायन आणि नृत्यामध्ये रुढीपरंपरा मानणा-या आजीला मनविणारी नाटिका जी कौटुंबिक मूल्यांची उलगडा करत होती. ती विद्यार्थ्यांनी सादर केली. नात्यातील प्रेम, भावना आणि विश्वास यातुन अधोरेखित झाले. शेतकरी कुटुंबातील कथा नाटिकेतुन सांगितले. त्यानंतर पारंपारिक नृत्य सादर करून एकात्मकतेचा जागर केला. याप्रसंगी अनुभुतीमधील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षक अभिनव चतुर्वेदी यांनी वार्षिक उपक्रमांविषयी सांगितले. प्राचार्य देबासिस दास यांनी आभार मानले. अनुभूती स्कूलचे विद्यार्थी अर्थव कांबळे, हीतेशी बनोथ, अरिन देशपांडे, अलेफिया शकिर, क्रीश संघवी, वरधिने अग्रवाल, अवियुक्त जैन यांनी सुत्रसंचालन केले.

हे विश्वच आपले कुटुंब – ॲड. सुशील अत्रे

आपले कुटुंब हे फक्त आजी आजोबा,आई वडील, भाऊ बहिण किंवा नातेवाईकांपुरते मर्यादित आपण केले आहे. मात्र संत ज्ञानेश्वर यांनी 12 व्या शतकात हे विश्वची माझे घर मानावे हा संस्कार दिला. वसुधैव कुटुंबकम ही आपली संस्कृती आहे. त्यानुसार आपले वर्तन असावे. पृथ्वीवरील प्रत्येक घटक म्हणजे पशु-पक्षी, फुलं-झाडं, पर्यावरणातील प्रत्येक भाग आपलं कुटुंब मानलं पाहिजे. कुटुंब आणि कुटुंबाचे मूल्य याबाबत प्राईस आणि व्हॅल्यु ही संकल्पना ॲड. सुशील अत्रे यांनी समजून सांगितले जी गोष्ट आपल्याकडे उपलब्ध नसते तीची किंमत त्याच वेळी समजते. घरातील आजी आजोबा, नाना नानी रक्ताच्या नातलगाकडून कौटुंबिक मूल्य पुढील पिढीला संस्कारीत करते.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.