डिझेल संपल्याने ग्रा.पं.च्या ट्रॅक्टरचा नदीपात्रातच मुक्काम
यावल : प्रतिनिधी
येथील ग्रामपंचायत कार्यालयावर प्रशासकराज कारभाराचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक अडचणी निर्माण होत नागरिकांना त्या अडचणींचा रोज सामना करावा आहे. त्यातच आज रोजी केरकचरा वाहतूक करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टर मधील डिझेल संपल्याने सदरील ट्रॅक्टरचा काही वेळ मुक्काम नदीपात्रात झाला. यावरून ग्रामपंचायतीत किती भोंगळ कारभार सुरू आहे याचा प्रत्यय सर्वांसमोर आलेला आहे. तरी पुढच्या काळात ग्रामपंचायतीचा कारभार लोकाभिमुख कधी होणार? प्रश्न नागरिकांसमोर आहे.
साकळी ता. यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयानेने शासनाच्या मागील वर्षी प्राप्त झालेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून नवीन मिनीट्रॅक्टर घेतले. या ट्रॅक्टरच्या सहाय्याने गावात जमा करणे व जमा झालेला केर-कचरा, गटारीतील घाण वाहून नेण्याचे काम केले जाते. दरम्यान गेल्या तीन महिन्यांपासून ग्रा.पं. कार्यालयावर प्रशासकराज आलेले आहे. तथापि प्रशासक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे साकळीगाव अनेक नागरी समस्यांचे माहेरघर बनले आहे.
दि.६ रोजी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या केर-कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मधील डिझेल संपल्याने त्या ट्रॅक्टरला चक्क नदीपात्रातच मुक्काम करावा लागला. त्यामध्ये घाण भरलेली होती. याबाबत संबंधित आरोग्य कर्मचाऱ्याला विचारले असता ट्रॅक्टर मध्ये डिझेल संपले आहे. मी संबंधितांना फोन लावत आहे. पण फोन लागत नसल्याने ट्रॅक्टर जवळ भर उन्हात उभे राहावं लागत आहे. कारण ट्रॅक्टर सोडून मी घरी आलो तर त्यातील काही वस्तू चोरीला जाऊ शकता म्हणून मी ट्रॅक्टर उभा आहे असे सांगितले व याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना व नागरिकांना माहिती व्हावे या उद्देशाने त्या कर्मचाऱ्यांने डिझेल संपल्याने ट्रॅक्टर उभे असल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. एवढी दुर्दैवी व लाजिरवाणी गोष्ट सर्वांना दिसून आली. त्यामुळे नागरिकांच्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात चांगल्याच संतप्त भावना उमटल्या.
गटारी भरल्या तुडूंब
ग्रामपंचायतीच्या वेळकाढू कारभारामुळे गावात सर्वत्र गटारी घाणीने तुडूंब भरलेले आहे. त्यामुळे गावात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. अनेक ठिकाणी पाण्याची व्हॉल गळती झालेले आहे. अनेक विजेच्या खांबांवर लाईट नसल्याने सदर भागात अंधार असतो. यासह अनेक ठिकाणी धापे खराब झालेले आहे, रस्ते खड्डेमय झालेले आहे. इतरही नागरी समस्या निर्माण झालेल्या आहे. मात्र ग्रामपंचायतील या समस्या ऐकून घेण्यासाठी कोणीही अधिकारी पुढे येत नाही. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.