पाच लाखांच्या लाच प्रकरणात सरपंचासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव : शेतजमिनीच्या वादासंदर्भात तब्बल पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील दोन लाख रुपये स्वीकारल्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गावातील सरपंच, ग्रामपंचायतीचा लिपीक आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घडलेल्या प्रकाराची माहिती अशी: तक्रारदार यांची बहाळ रथाचे (ता. चाळीसगाव) येथे 1 हेक्टर 64 आर क्षेत्रफळाची शेतजमीन आहे. ग्रामपंचायत बहाळ यांनी हक्क दाखवत ही जमीन इतरांना भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता होती. यावर तक्रारदारांनी न्यायालयातून कायमस्वरूपी मनाई हुकूम मिळवला होता.
यानंतर सरपंच राजेंद्र महादू मोरे यांनी तक्रारदाराला भेटून, ग्रामपंचायतीच्या वादांपासून मुक्तता देण्याच्या मोबदल्यात दीड हजार चौरस फुटांचा प्लॉट खरेदी करून द्यावा, अशी मागणी केली. तक्रारदारांनी या मागणीला नकार दिल्यानंतर, त्यांनी दहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने याबाबत धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. यानंतर 29 नोव्हेंबर 2024 रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान सरपंच राजेंद्र मोरे आणि ग्रामपंचायतीचे लिपीक शांताराम बोरसे यांनी प्लॉट खरेदीसाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर त्यांनी पाच लाख रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली होती. आज, 26 डिसेंबर 2024 रोजी बहाळ येथील तक्रारदाराच्या घरी सापळा रचण्यात आला. यावेळी सरपंच राजेंद्र मोरे व लिपीक शांताराम बोरसे यांच्या सांगण्यावरून तिसरा आरोपी सुरेश ठेंगे याने दोन लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
सदर कारवाई: नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. धुळे येथील पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. संबंधित आरोपींमध्ये सरपंच राजेंद्र मोरे (वय 57), ग्रामपंचायतीचे लिपीक शांताराम बोरसे (वय 50) आणि सुरेश ठेंगे (वय 40) यांचा समावेश आहे. सर्व संशयितांना अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.