महाशिवरात्री किर्तनादरम्यान तरुणांचा गोंधळ, युवकाला बेदम मारहाण
जळगाव: महाशिवरात्रीनिमित्त मेहरुण येथील महादेव मंदिराजवळ आयोजित सप्ताहादरम्यान शनिवारी (२२ फेब्रुवारी) रात्री ९ वाजता किर्तन सुरू असताना काही तरुणांनी गोंधळ घालत शिवीगाळ केली. त्यांना समज दिल्याचा राग येऊन सुमारे २० ते २५ जणांच्या टोळक्याने बिजासन फकिरा घुगे (वय २९, रा. मेहरुण) यांना लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
किर्तन सुरू असताना क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांचा गोंधळ
महादेव मंदिराजवळ महाशिवरात्रीनिमित्त सुरू असलेल्या किर्तनावेळी काही तरुण क्रिकेट खेळत होते. खेळादरम्यान त्यांनी मोठा गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि शिवीगाळ केली. काही नागरिकांनी त्यांना समज दिली असता, त्यांनी रागाच्या भरात बिजासन घुगे यांच्यावर हल्ला केला.
परिसरात तणावाचे वातावरण, पोलिसांची घटनास्थळी धाव
या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अद्याप या प्रकरणाची कोणतीही अधिकृत नोंद पोलिस ठाण्यात झालेली नाही.