अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; बेकरी अन्न पदार्थांचा मोठा साठा जप्त
जळगाव । जळगाव जिल्हयात सुरु असलेल्या ख्रिसमस व नवीन वर्ष-2025 आगमनानिमित्त विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने बेकरी तपासणी मोहीम तीव्र केलेली आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार केक व खादयपदार्थांची विक्री सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या जळगाव कार्यालयाकडून जिल्हयातील सर्व हॉटेल्स, केक उत्पादक व विक्रेते, बेकरी अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते अशा आस्थापनांची तपासणी केली जात आहे.
या तपासणीत आस्थापनांच्या उलाढालीनुसार परवाना-नोंदणी केली आहे का?, कामगारांचे वैदयकीय तपासणी अहवाल, अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरलेल्या पाण्याचे अहवाल, कर्मचा-यांना योग्य प्रशिक्षण दिले आहे का? , सर्वसाधारण स्वच्छता, त्याप्रमाणे मुदतबाहय कच्चा माल व अन्नपदार्थांचा वापर होत आहे का? आदी बाबींची तपासणी केली जात आहे. याशिवाय बेक-यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेले तयार अन्नपदार्थ व अन्नपदार्थ बनविण्यासाठी वापरले जाणारे घटकपदार्थ रवा, पीठ, मैदा, तूप आदींचे नमुने यांची तपासणी करण्यात येत आहे.