जळगाव शहरातून जयश्री महाजन पेटवणार मशाल
जळगाव – जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील उमेदवारीवरून असणारा तिढा सुटला असून या मतदारसंघातून माजी महापौर जयश्री महाजन यांना शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंची मशाल घेऊन त्या विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
आघाडीची जागा कायम ठेऊन जळगाव शहर व जळगाव ग्रामीण या जागाची आदलाबदली करण्याचा किंवा उमेदवारांना पक्ष बदलण्यास सांगून त्या त्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा पर्याय त्यांनी कायम ठेवला. त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी महापौर जयश्री महाजन विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट झाला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुरु होता. काल शरद पवार यांनी आपली पहिली यादी जाहीर केली. यात जळगाव जिल्ह्यातील देखील जळगाव ग्रामीण, मुक्ताईनगर व जामनेर विधानसभा मतदार संघात उमेदवार उभे केले असून आता उद्धव ठाकरे यांच्याकडून जळगाव शहरात माजी महापौर जयश्री महाजन यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी जोरदार मोर्चे बांधणी ठाकरे गटात सुरु होती. गेल्या दोन दिवसापासून महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुरु असताना हा तिढा अखेर पूर्ण झाला असून जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी आता माजी महापौर जयश्री महाजन यांना उमेदवारी फायनल झाली असल्याची माहिती सुनील महाजन यांनी दिली.