गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘शिवाई देवराई’ आणि वन उद्यानाचे लोकार्पण
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरी येथे ‘शिवाई देवराई’ आणि वन उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले.
शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पांतर्गत वन विभागाच्यावतीने किल्ले शिवनेरीवर अडीच एकर क्षेत्रावर तीन वनोद्यान व स्वतंत्र ‘शिवाई देवराई’ विकसित करण्यात आली आहे. देवराईची संकल्पना सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेची असून संस्थेच्या माध्यमातून जैन इरिगेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून सूक्ष्म आणि ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शिवनेरी गडावरील प्रत्येक थेंबाचा शाश्वत वापर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होत आहेत, त्यात किल्ले रायगडाप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी खासदार तथा म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तुकला, अभियांत्रिकी, किल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. ते युगपुरुष, युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते. अठरापगड जातीचे, धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले. प्रजेच्या दुःखापुढे, कल्याणापुढे स्वतःचे दुःख, आराम कवडीमोल मानला. त्यांनी तलवार हाती घेतली पण निष्पापांच्या रक्ताने रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या तलवारीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो. ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते. शिवरायांकडील एक तरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास शिवजयंती साजरी करताना त्यांना हेच खरे अभिवादन ठरेल. त्यामुळे समाज, राज्य, देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळा मुथळने येथील लहान विद्यार्थ्यांच्या बाल पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली. विजय घोगरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास प्रांताधिकारी गोविंद शिंदे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुळे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.
शिवाई देवराई मार्गदर्शक ठरेल- मुख्यमंत्री
शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पांतर्गत वन विभागाच्यावतीने किल्ले शिवनेरीवर अडीच एकर क्षेत्रावर तीन वनोद्यान व स्वतंत्र ‘शिवाई देवराई’ विकसित करण्यात आली आहे. देवराईची संकल्पना सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेची असून संस्थेच्या माध्यमातून जैन इरिगेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून सूक्ष्म आणि ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शिवनेरी गडावरील प्रत्येक थेंबाचा शाश्वत वापर होणार आहे. हि देवराई इतर किल्ल्यांचा संवर्धनासाठी मार्गदर्शक ठरेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.