अहो नाथाभाऊ, तुम्ही माझ्या लग्नात … देवेंद्र फडणवीसांनी लग्नाबाबतचा ‘तो’ विषयच मिटवला
नागपूर : हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले असून आरोप प्रत्यारोप वरून अधिवेशन चांगलेच गाजले. यादरम्यान सभागृहात राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याचा आता देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
विदर्भासाठी आत्ता पॅकेज वगैरे जाहीर केलं गेलं. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही अशी घोषणा केली होती. त्याचं नेमकं काय झालं? असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला होता.
देवेंद्र फडणवीस यांचं नाथाभाऊंना आपल्या खास शैलीत उत्तर
देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर आपल्या शैलीत उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नाथाभाऊंनी नवा शोध लावला आहे. मी असं काही बोललोच नव्हतो. अहो नाथाभाऊ माझ्या लग्नात तुम्ही आला होतात. तेव्हा तुम्ही आमचे नेते होतात. मी जर अशी काही घोषणा वगैरे केली असती तर तुम्ही थांबवलं असतं ना माझं लग्न” असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. ज्यानंतर सभागृहातले आमदार हसू लागले. यानंतर आपण हे वृत्तपत्रात वाचल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलं ज्यावर लगेच माझ्यावर विश्वास ठेवा असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.