विद्यार्थ्यांनी जिज्ञासा वाढवली तर विज्ञान समजेल!
जळगाव | प्रतिनिधी
अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अभिनव कल्पनाद्वारे साकारलेले प्रोजेक्ट हे समाज हितासाठी उपयुक्त ठरू शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानिमित्त स्वयंप्रेरणेने केलेले प्रोजेक्ट मागील संकल्पना घेऊन त्यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन ते समाजातील प्रत्येक घटकापर्यंत कसे पोहचेल, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. विद्यार्थ्यांना जी कल्पना येईल त्यामागील जिज्ञासा वाढवावी यातून विज्ञान आणि त्यातून निर्माण होणारे नवनवीन इनोव्हेशन समजेल, असा संवाद अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांशी तज्ज्ञांनी प्रश्नोत्तरात साधला.
राष्ट्रीय विज्ञान दिनी अनुभूती निवासी स्कूलमधील ५ वी ते ८ व्या इयत्तेसह सर्व विद्यार्थ्यांनी मांडलेले विज्ञान मॉडेल, प्रोजेक्टचे अवलोकन करून विद्यार्थ्यांकडून ते समजावून घेतल्यानंतर जैन इरिगेशनमधील वरिष्ठ सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यामध्ये अभिजीत जोशी, जयकिसन वाधवानी, श्री. सुकूमार, आर. बी. येवले, प्रदीप भोसले यांचा सहभाग होता. यावेळी त्यांच्यासोबत अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन, प्राचार्य देबासीस दास, शास्त्र, गणिताचे शिक्षक उपस्थित होते.
अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘अनुभूती इनोव्हेशन’ सेंटर असून विद्यार्थांच्या कल्पकतेला वाव देत संशोधात्मक वृत्ती यातून जोपासली जाते. मॅग्रेटीक लिफ्टचे उपकरण, व्हाइस कंट्रोल ऑन ऑफ सिस्टम यासह विज्ञानावर आधारित विविध मॉडेल, प्रोजेक्ट शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली साकारतात. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, भौतिकशास्त्रातील प्राथमिक बाबी समजाव्या जेणे करून विद्यार्थी अत्याधुनिक विज्ञानावर आधारित उपकरणे, मॉडेल, प्रोजेक्ट तयार करतात. यावर्षी ३७ निरनिराळ्या प्रकारचे विज्ञान प्रोजेक्ट साकारलेले होते. त्यातील विशेष उल्लेखनीय असे की, ड्रोन टेक्नॉलॉजी, फ्युचर फार्मिंग, व्हर्टिकल फार्मिंग, हायड्रोपोनिक्स, बेसिक रोबोटिक्स, स्मार्ट इरिगेशन, ऑटो सेन्सार हॅण्ड सॅनेटायझर, लाय फाय यांचा समावेश होता. यासोबतच पर्यावरण, माहिती तंत्रज्ञान, गणित, इंजिनेअरिंग, कॉम्प्युटर, रोबोटिक्स तंत्रज्ञानावर आधारित हे प्रोजेक्ट होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या प्रोजेक्ट संबंधीत प्रश्नोत्तरांद्वारे संवाद साधला. आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञान आणि तंत्रज्ञान याचे महत्त्व आहे व जीवनाचा तो अविभाज्य भाग आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे कार्य प्रदर्शित करण्यासाठी या योगे एक व्यासपीठ मिळाले याचे कौतूक केले. विज्ञान प्रदर्शनातील प्रोजेक्ट बघितल्यानंतर विद्यार्थ्यांनी साकारलेले हे प्रकल्प हे प्रदर्शनापूरते मर्यादित न राहता त्यांना समाजहिताचे कसे करता येतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे. चांगली पुस्तकं, चांगली अनुभवी माणसं आणि शैक्षणिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा असतो अनुभूती निवासी स्कूलमध्ये सर्व व्यवस्था उपलब्ध आहे. जगात संशोधनात्मक दृष्टीने काय प्रयत्न सुरू आहेत यावरही तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर उत्तरामागे न धावता प्रश्न आधी निट समजून घेतला पाहिजे त्याचे मनन, चिंतन केले पाहिजे त्यानंतरच समाधानकारक उत्तर मिळू शकते. जगात अनेक अशी उदाहरणे आहेत ज्यांनी चिंतन, मननातून कल्याणाचे संशोधन पुढे आणल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. अनुभूती निवासी स्कूलमधील प्रोजेक्ट व प्रदर्शनीला इतर स्कूल मधील विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी भेट देऊन पाल्यांमधील संशोधकवृत्तीला चालना दिली. अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विज्ञान दिन वैज्ञानिक वृत्तीला चालनेसाठी अनुभूती निवासी स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला.