कोश्यारींचा राजीनामा मंजूर, बैस नवे राज्यपाल
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेल्या भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्यात आलं आहे.
भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. कोश्यारी यांना पदमुक्त केल्यानंतर नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले यांच्याबद्दल वादग्रस्त विधानं केल्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला होता. त्याचबरोबर “कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही”, असं विधान त्यांनी केलं होतं.
राज्यपालांकडून केल्या गेलेल्या विधानांवरून महाविकास आघाडीने राज्यपालांविरोधात मोर्चाही काढला होता. संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती आणि सातत्यानं विरोधकांकडून ही मागणी केली जात होती.
कोश्यारी पदमुक्त, बैस यांच्याकडे राज्यपालपदांची सूत्रं
वादग्रस्त विधानं आणि विरोधकांकडून लक्ष्य केलं गेल्यानंतर भगतसिंह कोश्यारी जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींकडे पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता राष्ट्रपतींकडून भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैस हे झारखंडमध्ये राज्यपाल म्हणून कार्यरत होते.
कोश्यारींना राज्यपालपदावरून पदमुक्त केल्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यांनी तिखट प्रतिक्रिया दिलीये. “महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो. नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी आशा करूयात. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा- सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो !”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.