जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन – कृषिभूषण विश्वासराव पाटील
जैन इरिगेशन व अंकूर सिडस् तर्फे तूर पीक परिसंवाद व शिवार फेरी
जळगाव : प्रतिनिधी
‘जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन…’ तुम्ही निसर्ग व पर्यावरण यांना राखून कडधान्य व अन्य पिकांचे भरघोस उत्पादन घ्यावे व मातीला सजीव ठेवावे असे आवाहन कृषीभूषण श्री विश्वासराव पाटील यांनी केले. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड आणि अंकुर सीड्स यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगतशील शेतकरी दिनेश रघुनाथ पाटील यांच्या नेरी पळसखेडे रस्त्यावरील शेतात तुर पीक परिसंवाद व शिवार फेरी कार्यक्रम आयोजण्यात आला होता. कृषीभूषण श्री विश्वासराव पाटील (लोहारा) हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, माजी प्रकल्प संचालक (आत्मा) अनिल भोकरे, अनिल चौधरी, दिलीप खोडपे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन आणि बळीराजाचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
आरंभी निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी इशस्तवन व स्वागत गीत सादर केले. आयोजकांतर्फे पाहुण्यांचे स्वागत केले गेले. जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक डी.एम. बऱ्हाटे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, जैन इरिगेशनचे वितरक ऍग्रो जंक्शनचे संचालक आणि प्रगतशील शेतकरी दिनेश पाटील हे आपल्या शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञान अवलंबत असतात. या तुरीच्या शेतात सुयोग्य पिकाचे वाण, दोन झाडांचे अंतर, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचनाचे व्यवस्थापन याविषयी सांगितले. पाण्याचे व खताचे चांगले व्यवस्थापन करावे आणि भरघोस उत्पादन घ्यावे असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला, शेतकऱ्यांनी बाजारात जे विकले जाईल ते पिकवावे. बाजारपेठेचा अभ्यास करून पिकांची निवड करून लागवड करावी. त्यासाठी उच्च कृषितंत्रज्ञान, ठिबक सिंचन, खते, मोबाईलसारखे तंत्रज्ञान वापरून गुणवत्तेचे भरघोस उत्पादन घ्यावे व जिल्ह्याला समृद्ध करावे. जिल्ह्यात साडेपाच हेक्टरवर कापूस लावला जातो. त्यात कडधान्य उडिद, मूग, तूर या पिकांना प्राधान्य द्यावे. याच सोबत जळगाव जिल्हा ठिबक सिंचनाचा अवलंब करणारा महाराष्ट्रातील एक नंबरचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, इथला शेतकरी सर्वात जास्त रासायनिक खतांचा वापर करतो. या सगळ्यांहून भूजल पातळी खूप खाली गेली आहे. भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत आहे. या तिन्ही गोष्टी चिंतनीय आहे. प्रशासन म्हणून त्यावर योग्य ते काम सुरू आहे परंतु याबाबत शेतकऱ्यांनी ही सजगता ठेवायला हवी असे आवाहनही त्यांनी केले. जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे, अंकुर सीड्स प्रा. लि. नागपूरचे सर व्यवस्थापक अमोल शिरसाठ आणि तुर पैदासकार नरेंद्र सावरकर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी मार्गदर्शन केले.
अंकुर सीड्स प्रा. लि. नागपूरचे सर व्यवस्थापक अमोल शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. कपाशी आणि त्यात तूर पीक आंतरपीक म्हणून घेतले जाते. कपाशिसाठी कंपनीने मोठ्या बोंडाचे संशोधन केले आहे. कंपनीने विकसित केलेल्या विविध वाणांची माहिती त्यांनी सांगितली.
जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ बी. डी. जडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेती करण्या आधी शेतकऱ्यांनी फ्रेम वर्क करायला हवे. तूर लागवड करण्याआधी आपण हेक्टरी किती उत्पादन घेऊ शकतो हे ठरविले पाहिजे. उत्पादन वाढीसाठी पिकाची ओळख करून घ्या. तुरीला सावत्र वागणूक देऊ नका, जमिनीच्या पोतनुसार रोपांचे अंतर ठरवावे. ठिबक सिंचन, फांद्यांची, शेंगांची संख्या इत्यादी विषयी काळजी घ्यावी. दाणा मोठा, चकाकी असलेली गुणवत्तेची तूर पिकवयची असेल तर न्युट्रिशनकडे संपूर्ण लक्ष द्यावे. गादी वाफा, ठिबक सिंचन, मलचिंग इत्यादीचां चपखल वापर व्हावा. फर्टीगेशन सुयोग्य पद्धतीने व्हायला हवे. गादी वाफा कसे, किती लांबी रुंदीचे असावे, दोन गादीवाफे यातील अंतर याबाबत तांत्रिक माहिती देण्यात आली. १० बाय सव्वा या अंतराने २५ एकरावर तुरीची लागवड केली आहे. तीन वेळा शेंडे खुडल्यामुळे फांद्यांची संख्या वाढली. एकरी सरासरी दाणे संख्या वाढून भरघोस उत्पादन घेता येते. प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन घ्यावे असे आवाहन केले.
अंकुर सीडचे तुर पिकपैदासकार नरेंद्र सावरकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी तुरीच्या भरघोस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना त्रिसूत्री सांगितली. यात पहिलं सूत्र म्हणजे झाडांची संख्या आणि त्याचे व्यवस्थापन नीट करायला हवे, दुसरे महत्त्वाचे सूत्र आहे की पीक संरक्षणाकडे चांगले लक्ष द्यावे आणि तिसरे महत्त्वाचे सूत्र म्हणजे वेळोवेळी तज्ञांनी सांगितल्यानुसार बुरशीनाशकांच्या फवारण्या करणे आवश्यक आहे. चारू या तूर पिकाच्या वाणाबद्दल माहिती आणि त्यांचे वैशिष्ट्ये देखील त्यांनी सांगितले. खान्देश, विदर्भ व मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या पसंतीचे वाण ठरले आहे. शेतकरी तुरीचे भरघोस उत्पादन घेत आहेत.
प्रगतशील शेतकरी दिनेश रघुनाथ पाटील यांनीही अनुभव कथन केले. कापूस व तुरीच्या लागवडीचा खर्च व मिळणारे उत्पादन यासाठीचे आर्थिक गणित मांडले. तुरीच्या लागवडीमुळे कसे फायद्याच्या गोष्टी सांगितल्या. दालमील असोसिएशनचे सचिव दिनेश राठी यांनी सांगितले की, जळगाव एमआयडीसीमध्ये १०० हून अधिक दालमील आहेत. त्यांच्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कच्चा माल उपलब्ध व्हावा. दाळ करण्यासाठी ज्या गुणवत्तेचा माल हवा तसा पुरविला तर आर्थिक दृष्ट्या ते योग्य ठरेल असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीजैन इरिगेशचे विभागीय व्यवस्थापक दिलीप बऱ्हाटे, अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे विभागीय व्यवस्थापक गजानन मारकड, भूषण कोठावदे (भाजीपाला विभाग) प्रगतशील शेतकरी दिनेश रघुनाथ पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक तीर्थराज इंगळे यांनी केले.