इच्छुकांचा मुंबईत ‘मुजरा’ अन् गल्लीत साहित्य वाटपाचा ‘गोंधळ’!
मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध फंडे : महिलांना साड्यांसह साहित्याचे आमिष
अनिकेत पाटील, संपादक
जळगाव | विधानसभा निवडणुकीचे वारे वाहु लागले असून इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मुंबर्इत उमेदवारीसाठी ‘मुजरा’ घालण्यासाठी येरझाल्या सुरु केल्या असून गल्लोगल्लीच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी साहित्य वाटपाचा ‘गोंधळ’ घातला आहे. महिला मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सणासुदीचे औचित्य साधून साड्यांसह संसारोपयोगी वस्तू वाटप करण्यात येत आहे.
महायुती आणि महाआघाडी अशी थेट लढत होणार असून सहा पक्षांकडून डझनाच्या वर इच्छुक असल्याने पक्षश्रेष्ठींच्या डोक्याचा ताप देखील वाढला आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात इच्छुकांना मंडळांच्या ‘पावत्यांवर’ देखील खर्च करावा लागला आहे. प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वार्ड निहाय विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येत आहे. युवक व महिला मतदार या वर्षी वाढल्याने त्यांना आकर्षित करण्यासाठी इच्छुक विविध कार्यक्रमांवर भर देत आहेत. त्यात युवकांसाठी विविध स्पर्धा, महिलांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत असून इच्छुकांनी उमेदवारी ते प्रचाराची आखणी-बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
एकीकडे उमेदवारीसाठी पक्षाच्या वरिष्ठांकडे फिल्डींग लावण्याचे प्रयत्न तर दुसरीकडे मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाईल याचे अंदाज बांधून त्या-त्या ठिकाणच्या मतदारांना खूष ठेवण्यासाठीचे जोरदार प्रयत्न चालविले आहेत. कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी इच्छुकांना त्यांचे ‘पाय’ धरावे लागत आहे. इतर पक्षांतील नाराजांना गळ घालण्यासाठीही इच्छुकांची दमछाक होत आहे. घरोघरी पोहचण्यासाठीची धडपड वाढली आहे. सुख, दु:खामध्ये सहभागी होण्यावर या इच्छुकांनी चांगलाच जोर दिला आहे. उमेदवारीसाठी सुरू असलेले पक्षांतर्गत राजकारण दूर सारण्यासाठी कसरतही करावी लागत आहे.
शक्तीप्रदर्शनावर भर
विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मतदासंघातून इच्छुकांकडून शक्ती प्रदर्शनाची कुठलीही संधी सोडली जात नाही. आता नाही तर कधीच नाही, याप्रमाणे इच्छुक उमेदवार फ्लेक्स, सोशल मीडिया, शुभकार्य, धार्मिक कार्यक्रम अशा विविध माध्यमांतून जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहण्याच्या प्रयत्नात आहेत. मतदासंघातील वसाहतींमध्ये भेटीगाठीवर भर दिला जात आहे.
गणेशोत्सवात मतदासंघांतील विविध मंडळांना आदरपूर्वक देणगी देण्यात येवून सत्कार, सन्मान करून घेण्यात आले. रिक्षा, टेम्पो व गाड्यांवर पोस्टर चिटकवून भावी आमदार, सार्थ निवड अशा वाक्यांतून प्रसिद्धी केली जात आहे.
मतदारांना योजनांची लॉटरी
यावर्षीचे सण-उत्सव विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करून त्यातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून केला जात आहे.यासाठी मतदारसंघात साड्या वाटप, गणवेश वाटप, भजनी मंडळांना साहित्य वाटप, ज्येष्ठांसाठी तिर्थयात्रा, घरगुती वस्तूंचे वाटप, सोसायट्यांचे गाळलेले कामे केली जात आहेत. मतदारही ही सुवर्णसंधी माणून मामा, भाऊ, ताई, दादा, आप्पांकडून आपुलकीने हवी ती कामे करून घेत आहेत.