१५ हजारांची लाच घेताना नगररचना सहाय्यक ताब्यात; भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी मागितली लाच
जळगाव : जळगाव महानगरपालिकेतील नगर रचना विभागाच्या वर्ग तीनच्या अधिकाऱ्याला 15 हजार रुपयाची लाच घेताना जळगावला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. मनोज समाधान वन्नेरे (३४, रा. जळगाव) असं लाच घेणाऱ्या नगररचना सहायकाचे नाव आहे.
याबाबत असे की, खेडी बुद्रुक येथील तक्रारदाराने महानगरपालिकेत एकूण तीन प्रकरणे मंजुरीसाठी दिली होती. पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी वन्नेरे याने सुरुवातीला २१ हजारांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. दुसऱ्या प्रकरणात महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे व सहायक संचालक दिघेश तायडे यांना देण्यासाठी प्रत्येकी १५ हजार रुपये अशी एकूण ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने सोमवारी (९ डिसेंबर) दुपारी ३ वाजता सापळा रचला. त्यात प्रकरणासाठी १५ हजारांची लाच स्वीकारताना मनोज वन्नेरे याला रंगेहाथ पकडले. पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. दिनेशसिंग पाटील, पोउनि. सुरेश पाटील, पोलिस नाईक किशोर पाटील, राकेश दुसाने यांनी ही कारवाई केली.