सब ज्युनिअर चेस स्पर्धेत महाराष्ट्राची संनिद्धीची घोडदौड सुरूच, तर मुलांमध्ये इम्रानची आघाडी कायम…
अभेद्य जैन, आत्मन जैन यांची स्पर्धेला उपस्थिती...
जळगाव |प्रतिनिधी
अनुभूती निवासी शाळेत सुरू असलेल्या राष्ट्रीय सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेत दि. 31 डिसेंबर रोजी दोन फेऱ्या खेळवण्यात आल्या. आतापर्यंत स्पर्धेत सात फेऱ्या झाल्या असून त्यात मुलींच्या गटात आघाडीवर असलेली आणि या स्पर्धेत आपल्या नैसर्गिक गुणवत्तेची चुणूक दाखवणारी
संनिद्धी भट व दिल्ली च्या साची जैन च्या रोमहर्षक मुकाबल्या मध्ये डावाच्या मध्यभागी एकापेक्षा एक चाली रचत संनिद्धी ने या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आपण प्रमुख दावेदार असल्याचे सिद्ध केले, २६ चालीत उंटाच्या बलिदानाने ३३ व्या चालीत प्याद्याच्या बलिदानाने व ३९ व्या चालीत हत्तीचे बलिदान देत आपले इरादे स्पष्ट केले. जशी संधी प्राप्त झाली तशी आपल्या वजिराने जोरदार मुसंडी मारत काळ्या राजावर मात केली.
दुसऱ्या पटावर युपी ची फीडे मास्टर शूभि गुप्ता हिने अमुख्थाच्या कमकुवत राजावर हल्ला चढवत विजयश्री संपादन केली. तिसऱ्या पटावर साडेचार गुणांसह खेळणाऱ्या तमिळनाडू च्या निवेदिता ने प.बंगाल च्या स्पर्या घोष चा सहज पराभव करत आपले आव्हान जिवंत ठेवले.
केरळच्या अनुपमा च्या सिसिलियन ग्रँड प्रिक्स हल्ल्याला सहजी परतवून लावत
पांढऱ्या राजाला ‘ ह३’ जागेवर जायबंदी करत उंट, प्यादे व हत्ती चा वापर करून मात दिली.
सातव्या फेरी अखेर , मुलींच्या गटात साडे सहा गुणांसह महाराष्ट्राची संनिद्धी भट आघाडीवर असून , तिच्याच पाठोपाठ अर्ध्या गुणांच्या फरकाने ६ गुणांसह उत्तर प्रदेश ची शुभी गुप्ता व साडे पाच गुणांसह प.बंगाल ची मृत्तिका आणि तमिळनाडू ची निवेदिता स्पर्धेमध्ये आगेचुक करत आहेत.
मुलांच्या गटात इम्रान व पारस उत्कंठावर्धक खेळ अनिर्णीत अवस्थेत निकाली निघाला तर दुसऱ्या पटावर जीहान शाह ने मयंक चक्रवती ला अंतिम स्थितीत बरोबरीत रोखले. सिसिलियन बचाव पद्धतीत खेळला डावामध्ये दिल्लीच्या दक्ष गोयल ने तेलंगणाच्या विघ्नेश ला चांगलेच कोंडीत पकडले होते पण वजिराची ई ३ जागेवर खेळली गेलेली चाल चुकल्याने जिंकण्याची संधी त्याने पूर्णपणे गमावली.
मुलांच्या गटात इम्रान ने आपली घोडदौड अशीच चालू ठेवली असून ६ गुणांसह तो स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व गाजवत असून, तब्बल ९ खेळाडू साडे पाच गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.
सामन्यागणीक स्पर्धा रंगतदार स्थितीत आली असून, या स्पर्धेचे विजेतेपद कुठला खेळाडू पटकावेल याची उत्कंठा सर्व बुद्धिबळ प्रेमींना आहे.
काल दोन फेऱ्यांचा झाला खेळ…
सकाळी झालेल्या फेरीच्या सुरुवातीला महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे खजिनदार विलास म्हात्रे यांनी सर्व सहभागी खेळाडूंशी संवाद साधला, त्यात ते म्हटले की, बुद्धिबळ हे तुम्हाला विचारशील आणि संयमी व्यक्ती बनवण्यास मदत करते, त्यामुळे आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करून खेळा.
तर दुपारी झालेल्या दुसऱ्या सत्रातील फेरीसाठी अभेद्य जैन व आत्मन जैन यांची विशेष उपस्थिती लाभली, यावेळी त्यांनी सहभागी खेळाडूंना जिद्दीने आणि एकाग्रतेने खेळा व नेहमी खेळण्याचा आनंद घ्या असा कानमंत्र दिला.