DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांचं अकाली निधन

मुंबई : मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वातील अष्टपैलू अभिनेता अतुल परचुरे यांचं निधन झालंय. अलीकडे त्यांनी आपल्या आरोग्य विषयी एक खुलासा केला होता, त्यामुळे त्यांचे चाहते काळजी करत होते. आपण एका वेदनादायी आजाराशी सामना केल्याचे त्यांनी म्हटलं होतं. अतुल परचुरे यांनी खुलासा केला होता की त्यांना कॅन्सरचे निदान झालं होतं. या आजाराबद्दल त्यांना कशी माहिती झाली आणि आता त्यांची तब्येत कशा आहे याचा खुलासा त्यांनी स्वतःचा केला होता. मात्र आज त्यांचं अकाली निधन झालं. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शस्त्रक्रियेला विलंब झाला? 
अतुल परचुरे त्यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात फिरण्यासाठी गेले होते. या सुट्टी दरम्यान त्यांची भूक मंदावली होती. काहीतरी गडबड असल्याची त्यांना जाणीव झाली. यावर उपाय म्हणून त्यांनी काही औषधेही घेतली, परंतु त्याचा काहीच फायदा होत नव्हता. भारतात परतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी अल्ट्रासोनोग्राफी केली. त्यावेळी त्यांच्या पोटात ट्यूमर सापडला आणि त्यात कॅन्सर असल्याचे डॉक्टरांचं म्हणणं होतं. यातून ते बरे होतील असा विश्वास डॉक्टरांनी त्यांना दिला. परंतु उपचारादरम्यान त्यांची तब्येत आणखी बिघडत गेली आणि शस्त्रक्रियेलाही विलंब झाला.

प्रकृती बिघडत गेली 
कॅन्सर झाल्याचं कळल्यानंतर पहिले उपचारच चुकले होते. त्यांच्या पँक्रियाला बाधा झाली आणि अडचणीत वाढ झाली. चुकीच्या उपचाराने प्रकृती बिघडत गेली. त्यांना चालताना, बोलताना त्रास होत असताना त्यांना डॉक्टरांनी दीड महिने प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला होता. शस्त्रक्रिया करण्यात अनेक अडथळे असल्याचं त्यातून परिस्थिती आणखी बिघडू शकते, असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर योग्य उपचारांना सुरूवात झाली आणि केमोथेरपी केली. या काळात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने त्यांना साथ दिली. योग्य उपचारानंतर अतुल परचुरे पूर्णपणे बरे झाले. अलिकडच्या काळात त्यांना कोणताही त्रास होत नव्हता. मात्र, सोमवारी त्यांचं निधन झालं.

“रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचं अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली देदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. तरुण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु. ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे. हे नुकसान भरुन येण्यासारखे नाही. परचुरे यांच्या हजारो चाहत्यांपैकी एक या नात्याने कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो. राज्य सरकारच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहतो.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.