DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गांधी रिसर्च फाऊंडेशनला ‘ग्रिहाचा एक्झम्पलरी परफॉर्मन्स पुरस्कार’

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याहस्ते गौरव

जळगाव | प्रतिनिधी 

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी तीर्थ या वास्तूला ग्रीन बिल्डींग संबंधीचा केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय व टेरी यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘ग्रीहा’ या संस्थेतर्फे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अनुकरणीय स्थान निर्माण करणाऱ्या सद्यस्थितील इमारतींसाठीचा ग्रिहा एक्झम्पलरी परफॉर्मन्ससाठीचा देशातील पहिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्याहस्ते नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरच्या मार्गोसा लॉन येथे दि.10 डिसेंबर ला हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. गांधी रिसर्च फाउंडेशन ला शाश्वत बांधकाम साहित्य-तंत्रज्ञान वापरून पर्यावरणपूरक इमारत उभी केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मुख्य समन्वयक उदय महाजन, जैन इरिगेशनचे सिव्हील विभागाचे आशिष भिरूड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी व्यासपिठावर नार्वेचे भारतीय राजदूत हॅन्स जॅकोब फ्रीडनलंड, डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी सॅने, सेंट गोबेन इंडिया प्रा. लि. चे मुख्य राष्ट्रीय अधिकारी आनंद संथानम, ग्रिहा (GRIHA) कौन्सीलच्या अध्यक्षा डॉ. विभा धवन, ग्रिहा कौन्सीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठ, युनायटेड नेशनच्या भारताचे पर्यावरण प्रकल्प व्यवस्थापक श्रीमती दिव्या दत्त उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत डॉ. विभा धवन यांनी केले तर ग्रिहा कौन्सीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठ यांनी परिचय करून दिला.

महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी विचार युवापिढीवर संस्कारीत व्हावे या उद्देशाने संस्थापक भवरलाल जैन यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशन सुरू केले. ‘सार्थक करूया जन्माचे रूप पालटू वसुंधरेचे’ या भवरलाल जैन यांच्या विचारांच्या आधारावरच दि. 25 मार्च 2012 ला गांधीतीर्थ निर्माण केले आहे. जागतिक दर्जाचे आॕडिओ गाईडेड म्युझियमच्या माध्यमातून गांधी विचार समजून घेण्यासाठी जगभरातील  लाखो  पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ग्रिहा पुरस्कार प्राप्त इमारतीमध्ये पुर्णपणे अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा  वापर करण्यात आला असून या पुर्ण इमारती व परिसराचे रेनवॉटर हार्वेस्टींग केलेले आहे. ऊर्जा संवर्धनाच्या दृष्टिकोनातून सौर तंत्रज्ञानाचा वापर करीत पाण्याच्या काटेकोर वापराकडेही सुरुवातीपासून लक्ष देण्यात आले आहे. यामुळेच गांधी रिसर्च फाऊंडेशनला ग्रीहा पुरस्काराने गौरविण्यात आले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.