DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

‘जलजीवन मिशन’अंतर्गत ७७ गावांच्या योजना मान्य

जळगाव : प्रतिनिधी 
जिल्ह्यातील ८३८ गावांमधील पाणीपुरवठा योजनांसाठी ९२६ कोटी ७८ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला अाहे. त्यातील ७७ गावांना तांत्रिक मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनांना पंधरवड्यात प्रशासकीय मान्यता देऊन अंदाजपत्रक तयार असलेल्या ९४ गावांच्या योजनांनाही तत्काळ तांत्रिक मान्यता देण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले.

अजिंठा विश्रामगृह येथे शनिवारी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठक झाली. या वेळी पालकमंत्री बाेलत हाेते. जलजीवन मिशनच्या माध्यमातून सन २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहाेचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या योजनेत जिल्ह्यातील ८३८ गावांसाठी ९२६ कोटी ७८ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. योजना राबवणाऱ्या ग्रामपंचायतीने राष्ट्रीयीकृत बँकेत जलजीवन मिशनसाठी स्वतंत्र खाते उघडून त्यात कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी लोकवर्गणी जमा करणे आवश्यक आहे. यासोबत जिल्हा परिषदेला आवश्यक असणारी कागदपत्रे, ठराव, टाकीच्या जागा तसेच विहीर यांच्या जागा तत्काळ हस्तांतरित करणे; बुडीत क्षेत्रांतील विहीर असल्यास त्यासंबंधी प्रस्तावास आवश्यक कागदपत्रे उपविभागात सादर करणे गरजेचे आहे. पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर पाणी तपासणी करावी, लोकांत जनजागृती करावी. अंगणवाडी आणि शाळांना नळजोडणीत प्राधान्य द्यावे अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भोगवाडे, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे उपस्थित होते.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.