जळगाव जिल्हा बँकेत भाजपची माघार..निवडणूकीवर बहिष्कार
जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुक बिनविरोध करण्याचे ठरले असताना अर्ज भरण्याच्यावेळी चारही प्रमुख पक्षांनी अर्ज दाखल केले. यानंतर आजच्या माघारीच्या अंतिम दिवशी देखील नाट्यमय घडामोडी पाहण्यास मिळाली असून या निवडणूकीतून भाजपची पिछेहाट झाली आहे. जिल्हा बँक निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली. त्यामुळे आता बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे जाहीर करत आमचे सर्व उमेदवार हे अर्ज माघारी घेणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
गिरीश महाजन म्हणाले, की जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय पॅनल तयार करून उमेदवार निवडून दिले होते. आताच्या निवडणुकीसाठी असेच प्रयत्नांमध्ये सर्व पक्षांसोबत होतो. जागा वाटपापर्यंत चर्चा झाली होती. मात्र ऐनवेळी अन्य पक्षांनी विश्वासघात केला. मात्र आम्हाला गाफील ठेऊन बाकिच्यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्या. दोन महिने बैठका सगळे ठरलेले असताना शेवटच्या दिवशी युटर्न घेतला. दडपशाही करून भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज रिजेक्ट केले. सगळ्या ठिकाणी दडपशाही झाली. नावे ठरले असताना विश्वासघात केला. याचा निषेध म्हणून भाजपच्या सर्व उमेदवारांनी माघारी घेत निवडणूकीवर बहिष्कार टाकत असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
मागच्या पाच वर्षात चुकीचे कामे झाली. जिल्हा बँकेत ज्यांची सत्ता आहे त्यांचेच सहकारी कारखाने, सहकारी सूतगिरण्या, शैक्षणिक संस्था, उद्योग आहेत. त्यांनीच जिल्हा बँकेकडून आपल्या अशा संस्थांसाठी कर्ज मिळवून घेतले आहे. बँक शेतकऱ्यांसाठी आहे की पदाधिकारींसाठी हेच समजत नाही. या सर्व प्रकाराचा पाठपुरावा करून दूध का दूध और पाणी का पाणी करून समोर आणणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.