DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

दातांचा पिवळेपणा घालविण्यासाठी असा करा हळदीचा वापर

टीव्हीवरील टूथपेस्टच्या जाहिरातीमध्ये स्मितहास्य करणाऱ्या मॉडेलचे शुभ्र दात पाहताना आपले ही दात तितकेच आकर्षक दिसावेत असे आपल्यालाही वाटून जात असते. टीव्हीवरील मॉडेलच्या, किंवा एखाद्या सेलिब्रिटीच्या दातांचा शुभ्रपणा ही बहुतेकवेळी ‘फोटोशॉप’, मेकअप आणि क्वचित प्रसंगी महागड्या कॉस्मेटिक प्रक्रियांची कृपा असते. पण म्हणून असे शुभ्र दात आपल्याला लाभणार नाहीत असे मात्र नाही, कारण घरच्याघरी उपलब्ध असलेले साधे पदार्थ वापरून आपण आपले दात शुभ्र आणि चमकदार बनवू शकता. यामध्ये सर्वात प्रभावी आणि सहज उपलब्ध असलेला पदार्थ म्हणजे हळद. हळद हा मसाल्याचा पदार्थ प्राचीन काळापासून निरनिराळ्या कारणांस्तव आपल्या घरांमध्ये वापरण्यात येत आहे. स्वयंपाकामध्ये, औषधी (अँटीसेप्टिक) म्हणून, आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी देखील हळद वापरण्याची परंपरा फार प्राचीन आहे.

‘जर्नल ऑफ नॅचरल बायोलॉजी अँड मेडिसिन’च्या अनुसार हळद दातांच्या आणि हिरड्यांच्या अनेक समस्यांवर उत्तम औषधी आहे. हिरड्यांना झालेले जीवाणूंचे संक्रमण आणि परिणामी आलेली सूज, जिंजीव्हायटीस या रोगांवरही हळद प्रभावी औषधी असल्याचे म्हटले आहे. हळदीमध्ये असलेल्या हायड्रो-कुर्कुमीन मुळे तोंडातील संक्रमक जीवाणू नाहीसे होऊन दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. चीनमध्ये देखील दातदुखी आणि हिरड्यांच्या समस्यांवर हळदीचा वापर फार प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. आयुर्वेदामध्येही दातांच्या आरोग्यासाठी हळद उपयुक्त असल्याचे म्हटले गेले आहे.

दातांचा पिवळसरपणा घालविण्यासाठी हळदीचा वापर निरनिरळ्या प्रकारे करता येतो. यासाठी टूथब्रश हळदीमध्ये बुडवून त्यावर हळद घेऊन ही हळद दातांवर व्यवस्थित पसरावी. दातांवर हळद तीन ते पाच मिनिटे राहू देऊन त्यानंतर चुळा भराव्यात. त्यानंतर नेहमीच्या वापरातील टूथ पेस्टने दात नेहमीप्रमाणे ब्रश करावेत. या उपायाने काहीच दिवसांमध्ये दातांचा पिवळेपणा नाहीसा होताना दिसू लागेल. ज्यांना हळदीची चव आवडत नसेल, त्यांनी हळदीमध्ये एखादा थेंब पेपरमिंट घालून हे मिश्रण दातांवर लावावे. हळदीचा वापर करून घरच्याघरी टूथ पेस्टही तयार केली जाऊ शकते. यासाठी चिमुटभर हळद घेऊन त्यामध्ये पाव चमचा खोबरेल तेल घालावे. त्यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा( खाण्याचा सोडा) घालून चवीसाठी एखादा थेंब पुदिन्याचे किंवा पेपरमिंटचे तेलही घालावे. हे मिश्रण एकजीव करून घेऊन दातांवर एकसमान पसरावे आणि दोन ते तीन मिनिटे राहू द्यावे. त्यानंतर चूळा भरून टाकाव्यात आणि नेहमीप्रमाणे टूथ पेस्टने दात ब्रश करावेत.

दातांचा पिवळेपणा घालविण्यासाठी हळदीचा वापर करताना हळद वापरून तयार केल्या गेलेल्या मिश्रणाचा वापर दिवसातून एकदाच करावा. हळदीच्या अतिरिक्त वापराने दातांवरील संरक्षक कवच, म्हणजेच इनॅमलला नुकसान होण्याचा संभव असतो. हळदीच्या मिश्रणाचा वापर केल्यानंतर दात नेहमीच्या टूथ पेस्टने व्यवस्थित घासून हळदीचे अंश दातांवर शिल्लक राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच हळदीचे मिश्रण दत्नावर लावताना ते कपड्यांवर सांडणार नाही याची काळजी घ्यावी. कपड्यांवर हळदीचे मिश्रण सांडल्यास हळदीचे कायमस्वरूपी डाग कपड्यांवर पडू शकतात.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.