DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

देशासाठी 23 हजार काेटींचे पॅकेज:केंद्राकडून राज्याला 123 कोटी निधी; तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी वितरित : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार

नाशिक:

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच राज्य सरकारांना नियोजनाच्या सूचना करण्यात आल्या असून प्राथमिक साेयी-सुविधा,औषधांसाठी सुमारे २३ हजार काेटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राला पहिल्याच टप्प्यात १२३ काेटींचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आराेग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी दिली. देशातील प्रत्येक राज्य सरकारने काेविडच्या काळात स्वतंत्र अर्थसंकल्प सादर केले असताना महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र बजेटच न दिल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

‘दिव्य मराठी’च्या नाशिक कार्यालयात शुक्रवारी (दि.२७) दिलेल्या भेटीप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, इतर देशांमध्ये तिसऱ्या लाटेला सुरुवात झालेली आहे. विदेशात जिथे माेठ्या प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे, तिथे मास्क वापरले जात नसल्यानेच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. भारतात अद्याप दुसरी लाटच नियंत्रणात येत असून केंद्र सरकारने तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

राज्य सरकारांनाही तातडीने बालराेगतज्ज्ञांचा टास्क फाेर्स नियुक्त करून आवश्यक त्या ठिकाणी स्वतंत्र रुग्णालयांमार्फत तपासणी सुरू करण्याचे व त्यासाठी कंत्राटी तज्ज्ञ डाॅक्टर, औषधांचा साठा व रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी महाराष्ट्राला पहिल्या टप्प्यात १२३ काेटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत केंद्राकडून तिसरी लाट उपाय आणि काेराेना प्रतिबंधक लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी सर्वच राज्यांना समप्रमाणात साधनसामग्रीचा पुरवठा केला जात आहे. त्यातही ज्या राज्यांमध्ये मागणी आणि लसीकरणाचे प्रमाण सर्वाधिक आहे, त्यांना प्राधान्य दिले जात आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता व मुंबईसारखी आर्थिक राजधानी हे लक्षात घेऊन लसीचा आवश्यक पुरवठा केला जात आहे. उपलब्धतेनुसार राज्य सरकारला केंद्राकडून १५ दिवस आधीच लसींचा पुरवठा केला जातो. मात्र,राज्याकडून त्याचे याेग्य नियाेजन केले जात नसल्यानेच नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची टीकाही त्यांनी केली. दाेनच दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक ९३ हजार डाेस देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संदर्भ रुग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी घेणार आराेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक
उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात येणाऱ्या बहुतांशी हृदयराेग, कर्कराेग, मूत्रपिंड रुग्णांवर उपचारांसाठी आवश्यक यंत्रणा नादुरुस्त असल्याने रुग्णांची गैरसाेय हाेत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात, जिल्हा रुग्णालय, आराेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत तातडीने विशेष बैठक घेऊन त्यावर उपाययाेजना केल्या जातील, असेही पवार यांनी सांगितले.

आयुष्मान भारत- महात्मा फुले जीवनदायी योजनांचा लागाेपाठ लाभ देण्याचे प्रयत्न
केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेंतर्गत रुग्णांवर ५ लाखांपर्यंत माेफत उपचार करता येतात. राज्य सरकारच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत उपचारांसाठी दीड लाखाची माेफत उपचार मर्यादा आहे. गाेरगरिबांना दोन्ही योजनेंचा लाभ मिळावा यासाठी या दोन्ही याेजना एकत्र करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जीवनदायी योजनेचा दीड लाखाचा लाभ संपला की पुढे आयुष्यमान भारत योजनेचा लाभ त्वरित मिळावा, यासाठी नियाेजन सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.