DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा पात्र शेतकऱ्यांना त्वरीत लाभ द्यावा – गुलाबराव पाटील

जळगाव । प्रतिनिधी  

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील जे शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र आहेत. अशा पात्र लाभार्थ्यांची नुकसानीची भरपाई विनाविलंब त्यांच्या खात्यावर जमा करावी. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्वसंबंधीत विमा कंपन्याचे प्रतिनिधी व यंत्रणांना दिलेत.

 

जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा आज पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. याप्रसंगी आमदार अनिल पाटील, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, विविध विमा कंपन्यांचे प्रतिनिधी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. या नुकसानीचे यंत्रणांनी अचूक पंचनामे करावेत. जिल्ह्यातील कुणीही नुकसानग्रस्त शेतकरी यापासून वंचित राहणार नाहीत. याची यंत्रणांनी दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्ह्यात सर्वसमावेशक ठरतील अशा ठिकाणी हवामान मापक केंद्राची निर्मिती होणे आवश्यक असून त्यासाठी गावपातळीवर सरपंचानी गावातील शेतकऱ्यांच्या हितार्थ पुढाकार घेवून हवामान मापक केंद्रासाठी त्यांच्या अखत्यारीतील जागा उपलब्ध करुन देण्याचे आवाहन त्यांनी बैठकीत केले.

कृषि खात्याने अतिवृष्टी, वादळ आदि नैसर्गिक आपत्तीची तात्काळ गावपातळीवरुन माहिती उपलब्ध करुन घेण्यासाठी कृषि सहाय्यक, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर विम्यांची रक्कम कशी प्राप्त करुन घेता येईल यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे, सर्वच शेतकरी शिक्षित नसल्याने संगणक अथवा भ्रमणध्वनी सारख्या अद्यावत यंत्रणा हाताळू शकत नाहीत. त्यामुळे यंत्रणांनी विमा कंपन्या आणि शेतकरी यांच्यातील दुवा बनावे. याकरीता कृषि विभागाने पुढाकार घेण्याची सुचनाही पालकमंत्र्यांनी केली.

प्रारंभी जिल्हा अधिक्षक कृषि अधिक्षक संभाजी ठाकूर यांनी सन 2020 आणि 2021 या कृषि हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेला लाभ आणि प्रलंबित लाभ यांची सविस्तर माहिती सादर केली. कृषि खात्याकडून शेतकऱ्यांना विम्याच्या रक्कमा तात्काळ मिळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही माहिती त्यांनी बैठकीत सादर केली. यात सन 2020-21च्या खरीप हंगामात 10 हजार 159 शेतकऱ्यांना 4 कोटी 70 लाख 97 हजार 499 रुपये विमा रक्कम मंजूर करण्यात आली आहेत. सन 2021-22 च्या खरीप हंगामात 37 हजार 506 शेतकऱ्यांना 27 कोटी 7 लाख 29 हजार विमा रक्कम मंजूर झाली आहेत. तर सन 20-21 मध्ये मृग बहार 68 शेतकऱ्यांना 10 लाख 62 हजार 243 विमा रक्कम मंजूर झाली असून अंबिया बहार अंतर्गत 12 हजार 847 शेतकऱ्यांना 28 कोटी 3 लाख 62 हजार 346 विमा रक्कम मंजूर झाली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात यावर्षी एप्रिल 2021 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे 5 लाख 72 हजार 81 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून याच्या नुकसान भरपाई पोटी 64818.99 लाख रक्कमेच्या निधी मागणी केला असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी बैठकीत दिली.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.