DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

बेपत्ता शेतमजूर तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

कुऱ्हा काकोडा :प्रतिनिधी
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतमजूर तरुणाचा मृतदेह गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत सापडला. त्यामुळे गावात खळबळ उडाली.नितीन भारत दाते (वय ३५) असे या तरुणाचे नाव असून, तो बुधवारी (ता. २४) सायंकाळपासून बेपत्ता होता. शुक्रवारी (ता. २६) सकाळी सहाच्या सुमारास गावातील चंद्रकांत इंगळे प्रातःविधीसाठी गोरक्षगंगा नदीकाठी गेले असता, त्यांनी नदीकाठी असलेल्या सार्वजनिक विहिरीत डोकावून बघितले. तेव्हा त्यांना पाण्यावर काहीतरी तरंगताना दिसले. त्यांनी तातडीने शिवसेनेचे उपविभागप्रमुख दिलीप भोलाणकर यांना सांगितले.


भोलाणकर यांनी नितीनच्या वडिलांना सोबत घेऊन विहीर गाठली. याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर कुऱ्हा पोलिस चौकीचे पोलिस नाईक हरीश गवळी, पोलिस शिपाई प्रदीप इंगळे, राहुल नावकर, संजय लाटे, सागर सावे घटनास्थळी दाखल झाले. ज्ञानेश्‍वर तायडे, विनोद ढेंगे व भोलाणकर यांनी मृतदेह बाहेर काढला. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियदर्शी तायडे यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.