DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यात गोंधळ, भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले

सांगली : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात सांगलीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. मुख्यमंत्री निवेदने स्वीकारत नसल्याचा आरोप करीत त्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. तसेच हरभट रोडवर ठिय्या मांडला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनीही प्रत्युत्तर दिले. यावेळी शिवसेना आणि भाजपचे गट आमने सामने आल्याने तणाव वाढला होता. पोलिसांनी वेळीच दोन्ही गटांना बाजूला हटवल्याने अनर्थ टळला.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सांगली जिल्ह्यातील पूर पाहणीच्या दौऱ्यावर आहेत. सकाळपासून भिलवडी, अंकलखोप, कसबे डिग्रज येथे पाहणी केल्यानंतर ते सांगलीतील आयर्विन पुलावर पोहोचले. यानंतर हरभट रोडवरील व्यापाऱ्यांशी संवाद साधून ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होणार होते. हरभट रोडवर पोहोचताच त्यांनी व्यापाऱ्यांची निवेदने स्वीकारण्यास सुरुवात केली. याच वेळी बाजुला थांबलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. मुख्यमंत्री निवेदने स्वीकारत नसल्याचा आरोप करीत त्यांनी रस्त्यातच ठिय्या मांडला.

अचानक गोंधळ सुरू झाल्याने मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने शिवसैनिक आक्रमक बनले. भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करीत त्यांच्याकडे चालून जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी वेळीच अडवले. सुमारे पंधरा मिनिटे हा गोंधळ सुरू होता. यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना हरभट रोडवरून दुसरीकडे जाण्याचे आवाहन केले.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी मात्र हरभट रोडवरच ठिय्या मांडून घोषणाबाजी सुरू ठेवली होती. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या दौऱ्याला गालबोट लावण्याचे काम भाजपचा कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. मुद्दाम दौर्‍यात शिरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.