एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या लोकांकरिता कायदेविषयक कार्यक्रम
जळगाव ;- :जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, जळगाव आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांचे संयुक्त विदयमाने एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या लोकांकरिता कायदेविषयक माहिती व जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन दि.१२/०९/२०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हा एड्स नियंत्रण विभाग विभागातंर्गत एआरटी केंद्र,येथे करण्यात आले होते. मा. सचिव तथा न्यायाधिश जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव . श्री.एस. पी. सय्यद, समाज सेविका समांतर विधी सेवा सहा.भारती कुमावत, दिपशिखा साखला, माधुरी पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी-संजय पहूरकर, ART वैद्यकीय अधिकारी अनुपमा जावळे हे मान्यवर मंचावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वंदना पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर यांनी प्रस्ताविक केले. त्यांत त्यांनी मंचावर उपस्थित सर्वांची ओळख उपस्थितांना करून दिली. त्यानंतर समाज सेविका समांतर विधी सेवा सहा. भारती कुमावत यांनी शासनामापर्फत राबविण्यात येणा-या विविध सामाजिक योजनांविषयी माहिती उपस्थित लोकांना करून दिली. त्यात जास्तीत जास्त लोकांनी शासनाच्या विविध सामाजिक योजनांचा लाभ घ्यावा याबाबत उपस्थितांना आव्हान केले. त्यानंतर मा. सचिव तथा न्यायाधिश जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव श्री.एस. पी. सय्यद यांनी एचआयव्ही सह जीवन जगणा-या लोकांना त्याना काही कायदेविषयक मदत आवश्यक असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव विभागाकडे अर्ज सादर करण्याबाबत आव्हान केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव विभागामार्फत गरजु व्यक्तीस विनामुल्य वकिल उपलब्ध करून देण्यात येतात. तसेच एचआयव्ही/एडस कायदा 2017 बाबत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर माधुरी पाटील यांनी उपस्थितांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाकडील अर्ज आपण कसा भरावा किंवा कोणाकडून भरून घ्यावा याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. नंतर आयसीटीसी समुपदेशक – रुपाली दीक्षित गुप्तरोग समुपदेशक निशिगंधा कलाणे यांनी उपस्थितांना गुप्तरोगाविषयी माहिती करून दिली. तदनंतर जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर यांच्या समारोपीय भाषणाने सदर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सहा. कार्यक्रम-गिरीश गडे, जिल्हा सहा.लेखा मोहज्जीम खान, एआरटी केंद्रातील सर्व कर्मचारी, विहान संस्थेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.