भक्ती-शक्ती शिल्प हे समतेचे प्रतीक:-आमदार रोहित पवारनगरसेवक शाम पाटील यांच्या विकासात्मक कार्याने रोहित पवार भारावले
अमळनेर(प्रतिनिधी)
जगद्गुरू तुकोबाराय व छ. शिवराय यांचे भक्ती-शक्ती स्मारक हे प्रेरणेचे प्रतीक म्हणून उभारले गेले असून,सर्व संतांनी समतेचा विचार दिला,भेदभाव न करता माणुसकी ने वागण्याची, एकीने राहण्याची शिकवण दिलेली आहे. जाती धर्माच्या नावावर आपल्यात फूट पाडणाऱ्यां पक्ष संघटनांना युवकांनी धडा शिकवावा,आजच्या काळात ज्ञानाची भूक लागली पाहिजे असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी अमळनेर येथील नगरपरिषदेच्या तसेच नगरसेवक व आरोग्य सभापती शाम पाटील यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक ७ मध्ये उभारण्यात आलेल्या भक्ती शक्ती स्मारकशिल्प व लोकनेते शरदचंद्रजी पवार अभ्यासिकेचे लोकार्पण समारंभात केले.
छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य म्हणजे प्रत्येकाला स्वतःचे वाटेल असे राज्य होते.आज विकास कामे होतात पण ख-या अर्थाने लोकांना अपेक्षित आपलासा वाटणारा विकास दिसून येत नाही.शेवटच्या लाभार्थीपर्यंत एक रूपया पोहचला तर खरा विकास असतो.बदल घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान केले पाहिजे.असेही यावेळी पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमस्थळी युवकांचा उत्साह पाहून मी भारावून गेलो आहे. राजमुद्रा फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक करीत लक्ष्मीनगर भागातील मृत संदीप रूल्हे यांच्या पत्नीने जर त्यांच्या मुलीला पुढील शिक्षणासाठी बारामतीच्या मुलीचे होस्टेलमध्ये राहण्याची परवानगी दिल्यास संपूर्ण शिक्षणाचा खर्च आम्ही करु अशी ग्वाही यावेळी आ.रोहित पवार यांनी दिली.तसेच सरस्वती विद्या मंदिराच्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले.
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी नगरसेवक शाम पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले,एक आदर्श प्रभाग म्हणून प्रभाग क्रमांक ७ ची वाटचाल सुरू असून येणाऱ्या काळात जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न असेल असे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सांगितले.
येथील नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील श्रीराम नगर भागात विविध विकासकामांमध्ये ढेकू रस्त्यावरील श्रीराम नगर जवळील खुल्या भूखंडावर नगरसेवक,आरोग्य सभापती तसेच संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष शाम पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेले संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य असे भक्ती-शक्ती स्मारक, लोकनेते शरदचंद्रजी पवार अभ्यासिकेचे आ रोहित पवार यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात व जल्लोषात लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. रविंद्रभैय्या पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. पुष्पालता पाटील, मा.नगराध्यक्ष विनोद भैय्या पाटील, कृ.उ.बा मुख्य प्रशासक सौ. तिलोत्तमा पाटील,ग्रंथालय सेल च्या सौ.रिता बाविस्कर, राष्ट्रवादी चे अनिल शिसोदे, जयवंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.तर कार्यक्रम स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच राजमुद्रा फाऊंडेशन, संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते यांचे सह ढेकू रोड व पिंपळे रोड परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात समाजकारण आणि राजकारणाची सांगड घालून विकासकामे करीत असल्याचे नगरसेवक श्याम पाटील यांनी सांगितले यावेळी सुत्रसंचलन सौ.वसुंधरा लांडगे, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजमुद्रा फाउंडेशन चे युवा कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.