भोईटेनगर, असोदा रेल्वे उड्डाणपुलांचे अडथळे दूर करा : जिल्हाधिकारी राऊत
जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामास विलंब झाला आहे. पुलाचे काम करताना वीजखांब शिफ्टींग, जलवाहिनी शिफ्टींग आदी कामांच्या अडचणी आल्या होत्या. यामुळे कामाला विलंब झाला आहे.
शहरासह जिल्ह्यात ज्याठिकाणी उड्डाणपूल होत असतील, त्याठिकाणी काम सुरू करण्यापूर्वीच कामात येणारे संभाव्य अडथळे अगोदर दूर करावीत. नंतर दिलेले काम ठरावीक वेळेतच पूर्ण करण्यास कंत्राटदाराला सांगावे, असे पत्रच बांधकाम विभागाला दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
शहरातील शिवाजीनगरवासीयांची जीवनवाहिनी असलेला उड्डाणपुलाला अतिविलंब झाल्यामुळे तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या पुलासारखे पिंप्राळा व इतर पुलांना विलंब होऊ नये, यासाठी काम सुरू होण्यापूर्वीच खबरदारी घेण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम तीन वर्षांपासून रेंगाळले असून, स्थानिक नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या पुलासाठी आता आंदोलने होत आहेत. इतर पुलांबाबत असे व्हायला नको, याबाबत आपण काय भमिका घेणार, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी वरील माहिती दिली.
ते म्हणाले, की शिवाजीनगर पुलाचे सिव्हिल वर्क पूर्ण झाले आहे. लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी तातडीने काम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या पुलाबरोबर म्हसावद, धरणगाव लमांजन पुलाचे काम पूर्ण झाले आहे.