‘या’ म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करा ; रूपाली ठोंबरे
मुंबई :राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती माणसे गेली तर मुंबईत काय उरेल ?, असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय नते राज्यपालांवर जोरदार टीका करीत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनीही कठोर शब्दात संताप व्यक्त केला आहे.
राज्यपाल हे भाज्यपाल आहेत. भाज्यपाल राज्यपालांनी पदावरून पायउतार व्हावे. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला आहे. त्यामुळे माफी नको, राज्यपालांनी पदावरून दूर व्हावे, अशी मागणी रूपाली ठोंबरेंनी केली आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामागे भाजप आहे असा आरोप त्यांनी केला आहे. या म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करावी, असंही त्या म्हणाल्या. राज्यापालांना म्हाताऱ्या शब्द वापल्याने काहीजण त्यांची जीभ घसरली असंही म्हणत आहेत.
तसेच राज्यपालांच्या या वक्तव्यावर पुण्यामध्ये दुपारी आंदोलन झाले. तसेच कोल्हापुरातही शिवसैनिकांचे आंदोलन सुरु आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यावर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली, त्यात राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी असं म्हणत ठाकरेंनीही राज्यपालावंर टीका केली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण राज्यपालांच्या मताशी सहमत नसल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र हा मराठी माणसाच्या घामातून आणि परिश्रमातून उभा राहिला आहे, असंही फडणवीस म्हणाले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी देखील राज्यपालांच्या या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचे सांगितले आहे.