तुम्ही मर्द आहात ना… अमृता फडणवीस नवाब मलिकांवर चांगल्याच भडकल्या
मुंबई । वृत्तसंस्था
आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी ड्रग्ज प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आता भाजपकडून देखील त्यांना उत्तर दिले जात आहे.
आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, तुम्ही मर्द आहात ना? मग डायरेक्ट देवेंद्रजींना टार्गेट करा. मला मध्ये आणू नका, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणावर त्यांनी मौन सोडले आहे.
तसेच ज्या स्त्रिया सरळ मार्गाने जात आहेत त्यांना डिवचू नका, देवेंद्रजींना टार्गेट करायला तेच आज माझ्याबाबतीत केले गेले. तुम्ही मर्द आहात ना? डायरेक्ट त्यांना टार्गेट करा. मला मध्ये नका आणू. एक समाज सेविका म्हणून मी माझे विचार प्रकट करत असते आणि करत राहील.
मला कोणीही थांबवू शकत नाही, असे म्हणत त्यांनी नवाब मलिक यांना इशारा दिला आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे. फडणवीसांच्या बचावासाठी आता संपूर्ण भाजप पुढे आली आहे. आता नवाब मलिक त्यांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यामध्ये भाजप नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला असता. ते म्हणाले, नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसतंय. रोज सकाळी उठल्यावर कुठलातरी फोटो शोधायचा आणि त्या आधारे ट्विट करून सनसनाटी निर्माण करायची, असेही ते म्हणाले.
तसेच फडणवीस यांनी देखील दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. मात्र दिवाळीनंतर मीच बॉम्ब उडवणार असे म्हटले आहे. यामुळे हे प्रकरण अजून वाढण्याची शक्यता आहे.