DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

हवामानात अचानक बदल; जळगावात विजांच्या कडकडाटासह पाऊस

जळगाव : हवामान विभागाने जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यासाठी अवकाळी पावसाचा इशारा देत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यानुसार सोमवारी सायंकाळी अचानक हवामानात बदल झाला. शहरात ढगांची दाटी, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच धांदल उडाली, तर रस्त्यावरील विक्रेत्यांना आपला माल सुरक्षित करण्यासाठी धावपळ करावी लागली.

गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या जळगावकरांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने वातावरणातही सुखद बदल जाणवू लागला. मात्र या अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.

हवामान विभागाने यापूर्वीच ३० व ३१ मार्चदरम्यान जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती. सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहता हा अंदाज खरा ठरत असल्याचे दिसून येत आहे. पुढील काही तास हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून कोणतीही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.