अजंदे–रावेर मार्गावर वीजवाहिनी दुरुस्तीतून ठिणगी; आगीत ३ एकर मका खाक, शेतकऱ्याला मोठा फटका
रावेर – तालुक्यातील अजंदे–रावेर रस्त्यावर वीजवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामादरम्यान गंभीर दुर्घटना घडली. काम सुरू असताना झाडाची मोठी फांदी वीजवाहिनीवर कोसळल्याने ठिणग्या उडाल्या आणि काही क्षणांतच शेतात भीषण आग लागली. वाऱ्यामुळे आगीने वेगाने फैलावत रौद्र रूप धारण केले आणि डोलणारे मका पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
या आगीत सुमारे तीन एकरांवरील मका पूर्णपणे जळून खाक झाला. तसेच परिसरातील १०० ते १५० केळीच्या खोडांसाठी लावलेल्या ठिबक सिंचनाच्या नळ्या व पाइपही जळाले. हाताशी आलेले पीक नष्ट झाल्याने संबंधित शेतकरी हवालदिल झाला असून त्याचे अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच रावेर नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आग विझवण्याचे काम सुरू असतानाच ‘एअर लॉक’ झाल्यामुळे गाडी बंद पडली. आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा कोलमडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र ढिसाळ नियोजनाचा मोठा फटका शेतकऱ्याला बसला.