DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

वैयक्तिक वादाला पक्षाचे स्वरूप देऊ नका; पक्षशिस्त पाळा!

गोपाल पोपटानी यांच्या वक्तव्यांवर भाजपची भूमिका स्पष्ट; पक्षाची प्रतिमा मलीन होईल अशी वक्तव्ये टाळण्याचे आवाहन

जळगाव : वैयक्तिक वादातून घडलेल्या घटनेला पक्षाशी जोडून भारतीय जनता पार्टीची प्रतिमा मलीन होईल, अशी वक्तव्ये करणे अयोग्य असून प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने पक्षशिस्त पाळावी, असे आवाहन भाजप जळगाव महानगर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हा चिटणीस गोपाल टिकमदास पोपटानी यांच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने आपली भूमिका प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केली आहे.
भाजप हा शिस्तबद्ध आणि मजबूत संघटनात्मक बांधणी असलेला पक्ष असून पक्षाची विचारधारा, संघटनात्मक एकता आणि प्रतिष्ठा जपणे ही प्रत्येक पदाधिकाऱ्याची जबाबदारी आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून गोपाल पोपटानी हे पक्षाच्या बैठका, संघटनात्मक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत नसल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. मागील वर्षभरापासून त्यांची पक्षातील सक्रियता दिसून आलेली नसून, यासंदर्भात त्यांना यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
वैयक्तिक मतभेद किंवा वादातून घडलेल्या घटनेचा संबंध पक्षाच्या संघटनात्मक भूमिकेशी जोडणे योग्य नाही. एखाद्या पदाधिकाऱ्याने केलेले वैयक्तिक वक्तव्य म्हणजे पक्षाची अधिकृत भूमिका ठरत नाही, असेही भाजपने स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य करताना त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर आणि कार्यकर्त्यांमधील एकतेवर होणारा परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. वैयक्तिक वादाला पक्षाचे स्वरूप देऊन संघटनेची बदनामी होईल, अशी वक्तव्ये टाळावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाची शिस्त, संघटनात्मक एकता आणि प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी जबाबदारीने वागावे. संबंधित पदाधिकाऱ्यांनीही आपल्या वक्तव्यांचे आत्मपरीक्षण करून यापुढे पक्षाची प्रतिमा मलीन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
भाजपचे प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे. पक्षहित हे वैयक्तिक हितापेक्षा श्रेष्ठ असून संघटनात्मक शिस्त आणि कार्यकर्त्यांचा सन्मान जपणे ही प्रत्येक पदाधिकाऱ्याची प्राथमिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.