DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

राज्यात हवामानाचा मोठा बदल; काही भागात पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेचा कहर

विदर्भात दोन दिवस पावसाचा इशारा; ८ मेपासून तापमान ४५ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता

मुंबई – राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून एका बाजूला तीव्र उष्णतेचा तडाखा बसत असताना दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील दोन दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच वादळी वारेही वाहू शकतात. या काळात तापमान काहीसे कमी राहणार असल्याने उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र ८ मेपासून तापमानात पुन्हा वाढ होऊन ते ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तरेकडून येणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे मे महिन्यात उष्णतेची तीव्रता अधिक वाढणार आहे. त्यामुळे संपूर्ण महिनाभर विदर्भासह राज्यातील अनेक भागांना उष्णतेचे चटके बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात दुपारनंतर अचानक वातावरण बदलले आणि अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. यामुळे कापणीस तयार असलेल्या धान पिकांसह आंबा आणि भाजीपाल्याच्या शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भंडारा जिल्ह्यातही वादळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. यापूर्वीच्या पावसामुळे आधीच नुकसान झालेल्या धान पिकांना पुन्हा फटका बसण्याची शक्यता आहे. जोरदार वाऱ्यामुळे पिके आडवी पडत असून उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे.

हिंगोली शहरासह परिसरातही अचानक वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडल्याने फळे व भाजीपाला विक्रेत्यांची धांदल उडाली. तर नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील काकार्डे परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे शेतातून काढून ठेवलेले पीक खराब होण्याची शक्यता आहे, तर नव्याने लागवड केलेल्या फळबागांना काहीसा फायदा होऊ शकतो.

एकूणच, राज्यातील बदलत्या हवामानामुळे शेतकरी आणि नागरिक दोघांनाही सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.