DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप

सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार; चौकात शिवमय वातावरण

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा देणाऱ्या जळगाव शहरातील शिवतीर्थ चौकाच्या सौंदर्यात आता आणखी भर पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील दुभाजकावर शिवकालीन मावळ्यांच्या भव्य आणि आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिवतीर्थ चौकाला ऐतिहासिक आणि देखणे स्वरूप प्राप्त झाले असून, शहरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा हा चौक आता जळगावच्या सौंदर्यातील मानबिंदू ठरत आहे.

जी.एम. फाउंडेशनच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभिनव उपक्रमाला सुप्रीम इंडस्ट्रीज जळगाव फाउंडेशनने संपूर्ण योगदान देत भक्कम साथ दिली आहे. सामाजिक बांधिलकी जपत शहराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभवात भर घालण्याच्या उद्देशाने हे सुशोभीकरण करण्यात आले आहे. उद्योगसमूहाची सामाजिक बांधिलकी आणि शहराच्या विकासाची सकारात्मक दृष्टी यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळत आहे.

या सुशोभीकरणाचा शुभारंभ मंगळवारी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जिवणे, महापौर दीपमाळा काळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, मान्यवर, सुप्रीम इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ढोल-ताशांच्या निनादाने परिसर दुमदुमला
शुभारंभ सोहळ्याला शिवरायांच्या शौर्याला साजेसा उत्साह लाभला. सुगंध, शिवसूर्य, शौर्यवीर आणि शिव तांडव या ढोल पथकांनी दमदार ढोलवादनातून छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांना मानवंदना दिली. ढोल-ताशांच्या निनादाने संपूर्ण शिवतीर्थ चौक दुमदुमून गेला. त्यामुळे परिसरात चैतन्याचे आणि शिवमय वातावरण निर्माण झाले. उपस्थित मान्यवरांसह नागरिकांनी ढोल पथकांच्या जोशपूर्ण सादरीकरणाचा आनंद घेतला.

मावळ्यांच्या शिल्पांतून शौर्याची अनुभूती
शिवतीर्थ चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा जळगावकरांच्या अस्मितेचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे. या पुतळ्यासमोरील परिसरात उभारण्यात आलेल्या शिवकालीन मावळ्यांच्या प्रतिकृतींमुळे चौकाला जणू शिवकालीन इतिहासाची जिवंत अनुभूती मिळत आहे. स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या मावळ्यांचे शौर्य, त्याग आणि स्वराज्यनिष्ठा नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडण्याचे काम या सुशोभीकरणातून झाले आहे.

सुप्रीम इंडस्ट्रीजच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक
शहराच्या विकासात उद्योगसमूहांनी केवळ आर्थिक योगदान न देता शहराची सांस्कृतिक ओळख, ऐतिहासिक वारसा आणि सार्वजनिक सौंदर्य जपण्यासाठी पुढाकार घ्यावा, याचे उदाहरण या उपक्रमातून समोर आले आहे. जी.एम. फाउंडेशनची संकल्पना आणि सुप्रीम इंडस्ट्रीज जळगाव फाउंडेशनचे संपूर्ण योगदान यामुळे शिवतीर्थ चौकाला नवी ओळख मिळाली आहे. सार्वजनिक ठिकाणांच्या सुशोभीकरणाला इतिहास आणि संस्कृतीची जोड दिल्यास शहराच्या सौंदर्याला वेगळे वैभव प्राप्त होते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे. शिवतीर्थ चौकातून दररोज ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांना आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मावळ्यांचे शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा या भव्य शिल्पांच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. जळगावच्या सौंदर्यात भर घालणारा आणि शिवरायांच्या इतिहासाची प्रेरणा देणारा शिवतीर्थ चौकाचा हा नवा साज जळगावकरांच्या कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय ठरत आहे.

 

 

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.