DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव विधान परिषदेसाठी भाजपचा निर्धार; डॉ.केतकी पाटील यांचे नाव आघाडीवर

जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद जागा गेल्या तब्बल १८ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. ही जागा कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सोडू नये, अशी भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीतील बैठकीत मांडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, संभाव्य उमेदवारांच्या चर्चेत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राजकीय हालचालींना अधिक वेग आला असून, जळगावच्या जागेबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यात अंतिम तोडगा निघणार की मैत्रीपूर्ण लढत होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीची जबाबदारी भाजपने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली आहे. महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यासाठी शिवसेना नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचे समजते. शनिवारी रात्री भाजप नेतृत्वाने इच्छुक उमेदवारांशी संवाद साधल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची चर्चा होऊनही संधी न मिळालेल्या डॉ. केतकी पाटील यांच्या नावाचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून डॉ. उल्हास पाटील आणि डॉ. केतकी पाटील यांना सकारात्मक संकेत मिळाल्याची चर्चा असली, तरी जागावाटपाचा अंतिम निर्णय होईपर्यंत सर्वपक्षीय मतदारांशी संपर्क वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
जळगावची जागा आपल्या वाट्याला यावी यासाठी शिवसेना देखील प्रयत्नशील आहे. विशेषतः पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी या जागेसाठी आग्रही भूमिका घेतल्याचे बोलले जाते. युतीत सहमती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत देण्याचाही पर्याय चर्चेत असल्याने महायुतीतील समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, मंत्री गुलाबराव पाटील यांची भूमिका देखील महत्त्वाची मानली जात आहे. उत्तर महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव आणि नाशिक या दोन जागांवरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नाशिकमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद लक्षात घेता ती जागा भाजपकडे राहण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्याबदल्यात जळगावची जागा शिवसेनेला देण्याचा पर्याय चर्चेत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अंतिम जागावाटपाचा फॉर्म्युला काय ठरणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सर्वपक्षीय मतदारांशी संपर्काचा फायदा?
माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी विविध सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रमांमुळे जिल्हाभरातील विविध पक्षांच्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध निर्माण केले आहेत. त्यामुळे डॉ. केतकी पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना केवळ भाजपच नव्हे, तर इतर पक्षांतील निर्णायक मतदारांचाही पाठिंबा मिळू शकतो, असा विश्वास भाजपच्या काही नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून असून, त्याच दिवशी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत डॉ. केतकी पाटील यांच्यासह अन्य संभाव्य उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसांत जळगावच्या राजकारणातील चित्र अधिक स्पष्ट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.