DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून

रावेर पोलिसांची काही तासांत गुन्ह्याची उकल; आरोपीला अटक

रावेर : रावेर तालुक्यातील गारखेडा येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने काकाचा खून करून तो अपघाती मृत्यू असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रावेर पोलिसांनी अत्यंत वेगवान व कौशल्यपूर्ण तपास करत अवघ्या काही तासांत या खुनाचा उलगडा करून आरोपीला अटक केली.

दि. २१ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता पाल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील गारखेडा येथे रामा थावरू बारेला (वय ४६) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत नाल्याजवळ आढळल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता मृताच्या डोक्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत झाल्याचे आढळून आले. त्यानंतर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ३५८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळावरील भौतिक पुरावे, तांत्रिक माहिती, स्थानिक चौकशी व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासात मयताचा सख्खा पुतण्या अनिल जखा बारेला (वय २९, रा. गारखेडा, ता. रावेर) याच्यासोबत जमिनीच्या कारणावरून दीर्घकाळ वाद सुरू असल्याचे निष्पन्न झाले.

तपासानुसार, दि. २१ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता आरोपीने घराजवळ लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात रामा थावरू बारेला यांचा जागीच मृत्यू झाला.

गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह सुमारे २० ते २५ मीटर अंतरापर्यंत ओढत नेऊन पायवाटेजवळील नाल्याच्या कडेला टाकला, जेणेकरून हा अपघाती मृत्यू असल्याचा आभास निर्माण होईल. मात्र, पोलिसांनी वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या तपासातून हा खुनाचा प्रकार उघडकीस आणला.

या प्रकरणी आरोपी अनिल जखा बारेला याला दि. २२ जुलै २०२६ रोजी रात्री अटक करण्यात आली असून, चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.