DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

वरणगाव पोलिसांची अवैध गुटखा तस्करीवर धडक कारवाई; ५.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

वरणगाव : जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत वरणगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पानमसाला व तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली. या कारवाईत गुटखा, पानमसाला, तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार असा एकूण ५ लाख १७ हजार ८६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई सुरू असून, त्याच अनुषंगाने वरणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांना २४ जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली. नॅशनल हायवे क्रमांक ५३ वरील मुक्ताईनगर-भुसावळ मार्गावर कपील वस्ती परिसरात प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच विशेष पथकाने सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईत चेतन लक्ष्मण नारखेडे (वय २८, रा. खालची आळी, नशिराबाद, जि. जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील एमएच-२० बीडी-३००० क्रमांकाच्या सिल्व्हर रंगाच्या इनोव्हा कारची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू आढळून आला.

यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा करण्यात आला. त्यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९७/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २४७, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार असा एकूण ५,१७,८६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नागरिकांना आवाहन

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला व इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. अशा अवैध व्यवसायाची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल ११२ वर कळवावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

कारवाईतील पथक

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक बेंडकोळी तसेच भूषण माळी, सुखराम सावकारे, उमेश बारी, परशुराम गुमलकर, इकबाल शहा, शफीक अली, गोपीचंद सोनवणे, प्रशांत ठाकूर, मनोहर बनसोडे आणि विजय बाविस्कर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.