मंत्री गिरीश महाजन यांचे AI-निर्मित फोटो व्हायरल?; जळगावात सायबर गुन्हा नोंद
जळगाव : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट आणि मॉर्फ केलेले फोटो तयार करून ते सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकुरासह प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका फेसबुक खात्यावरून मंत्री महाजन यांचे AI-निर्मित अथवा संगणकीय तंत्रज्ञानाद्वारे छेडछाड केलेले फोटो प्रसारित करण्यात आले. या छायाचित्रांसोबत बदनामीकारक आणि आक्षेपार्ह स्वरूपाचा मजकूरही जोडण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. तक्रार प्राप्त होताच सायबर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधितांविरोधात गुन्हा नोंदविला.

याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम ३५६, ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(सी) आणि ६७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाचा वापर करून एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे, खोटे फोटो अथवा व्हिडिओ प्रसारित करणे आणि दिशाभूल करणारी माहिती पसरविणे हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक सतीश गोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित फेसबुक खातेधारकाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाढत्या डिजिटल युगात AI तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणतीही माहिती पुढे पाठविण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी, असे आवाहनही सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे