‘ड्रॉप केस’ टोळींवर पोलिसांचा मोठा प्रहार; मुक्ताईनगरातील पाच गावांमध्ये पहाटेची धडक कारवाई
मुक्ताईनगर : फसवणूक, दरोडे आणि लुटमारीच्या घटनांसाठी कुप्रसिद्ध ठरलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील पाच गावांमध्ये जळगाव जिल्हा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे व्यापक शोधमोहीम राबवत गुन्हेगारीविरोधात मोठी कारवाई केली. लालगोटा, हलखेडा, मधापुरी, जोंधनखेडा आणि चारठाणा या गावांमध्ये एकाचवेळी धाडी टाकून संशयित आणि सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासातील ही सर्वात मोठ्या आणि नियोजनबद्ध मोहिमांपैकी एक मानली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरातील काही टोळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, सफेद बिबा, सुलेमानी दगड, जुने सोने, तांबे, दुर्मिळ वस्तू तसेच इतर आकर्षक वस्तू असल्याचा दावा करणारे व्हिडिओ प्रसारित करून नागरिकांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत होत्या. या आमिषाला बळी पडून गावात येणाऱ्या लोकांची फसवणूक, लूटमार आणि मारहाणीच्या घटना घडत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

काही प्रकरणांमध्ये पीडित व्यक्तींना धमकावण्यासाठी त्यांच्या जवळ वन्यजीवांच्या कातड्यांसारख्या वस्तू ठेवून बनावट व्हिडिओ तयार केले जात असल्याची बाबही समोर आली आहे. यामुळे अनेक पीडित तक्रार करण्यास धजावत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या तीन वर्षांत या भागात दरोडे, खून, जबरी चोरी, फसवणूक, दरोड्याचे प्रयत्न आणि सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष मोहीम आखून ही कारवाई केली.
या मोहिमेदरम्यान फरेज राजू पवार, रामजाने राईसाहेब भोसले, आक्काबाई जोगिंदर भोसले, रोहित सुदेश पवार यांच्यासह अनेक संशयितांविरोधात शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, भारतीय न्याय संहिता आणि वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच विलास नरविलाल पवार आणि अजय दादा पवार या फरार आरोपींना अटक करण्यात आली.
कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे 20 लाख रुपयांची रोकड, अंदाजे 300 ग्रॅम सोन्याचे दागिने, चार किलो चांदीचे दागिने, दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसे, विविध वन्यप्राण्यांची कातडी, चार चारचाकी वाहने, सहा दुचाकी आणि 30 मोबाईल फोन जप्त केले. याशिवाय इतर संशयास्पद वस्तूही पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.