DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावात महायुतीचे नंदकिशोर महाजन मोठ्या मताधिक्याने विजयी

जळगाव : महाराष्ट्र विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भगवान महाजन यांनी एकतर्फी विजय संपादन करत प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने मागे टाकले. १८ जून रोजी पार पडलेल्या मतदानानंतर २२ जून रोजी झालेल्या मतमोजणीत महाजन यांना तब्बल ५८२ प्रथम पसंतीची मते मिळाल्याने त्यांचा विजय निश्चित झाला.

या निवडणुकीत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण ६३० मतदारांपैकी ६१६ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी ६११ मते वैध ठरली, तर ५ मते अवैध घोषित करण्यात आली. चाळीसगाव येथील शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता.

मतमोजणीच्या अंतिम आकडेवारीनुसार नंदकिशोर महाजन यांना टेबल क्रमांक १ वर २०७, टेबल क्रमांक २ वर १९१ आणि टेबल क्रमांक ३ वर १८४ अशी एकूण ५८२ मते मिळाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार शरद शामराव तायडे यांना १७ मते मिळाली. अपक्ष उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांना ११ मते, तर अपक्ष उमेदवार रेश्मा कुंदन काळे यांना केवळ १ मत मिळाले.

एकूण वैध मतांपैकी ९५ टक्क्यांहून अधिक मते महाजन यांच्या बाजूने पडल्याने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीची मजबूत पकड पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.

मतमोजणी प्रक्रिया जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, अर्चना मोरे तसेच प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या देखरेखीखाली शांततेत पार पडली.

विजयाची अधिकृत घोषणा होताच नंदकिशोर महाजन यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत ढोल-ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला. यावेळी मंगेश चव्हाण, राजूमामा भोळे, चंद्रकांत बाविस्कर, दीपक सुर्यवंशी, अरविंद देशमुख यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.