विधानसभेत आमदार राजूमामांचा जळगावच्या प्रलंबित प्रश्नांवर आवाज
गाळेधारक, फेरीवाला धोरण आणि मनपा नोकरभरतीचा मुद्दा सभागृहात उपस्थित
जळगाव : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे जळगाव शहराशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न सभागृहात उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले. यामध्ये महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा रखडलेला भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी तसेच मनपेतील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली.
सभागृहात बोलताना आमदार भोळे यांनी सांगितले की, जळगाव महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील तब्बल २,३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न सन २०१२ पासून प्रलंबित आहे. रेडीरेकनर दर निश्चितीमुळे हा विषय रखडला असून त्यामुळे हजारो व्यापाऱ्यांवर अनिश्चिततेचे सावट आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी महानगरपालिकेला आवश्यक प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले होते. नगरविकास विभागानेही त्यानुसार कार्यवाही करण्यास सांगितले असतानाही अद्याप प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. संबंधित प्रस्ताव तातडीने सादर करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी शहरातील फेरीवाले, हातगाडीधारक व लघु व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही उपस्थित केला. फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, पात्र फेरीवाल्यांचे सर्वेक्षण व नोंदणी, तसेच स्वतंत्र व्हेंडिंग झोन विकसित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. अतिक्रमण हटाव कारवाईमुळे अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होत असल्याने त्यांना नियोजित जागा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय जळगाव महानगरपालिकेतील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांमुळे प्रशासनाच्या कामकाजासह विकासकामांवरही परिणाम होत असल्याचे सांगत रिक्त पदांचा तातडीने आढावा घेऊन भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणीही त्यांनी शासनाकडे केली.
जळगाव शहरातील व्यापारी, फेरीवाले, हातगाडीधारक, मनपा कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हिताशी संबंधित हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची ग्वाही आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी यावेळी दिली.