संत सखाराम महाराज वाडी संस्थानला भीषण आग
शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात
अमळनेर : अमळनेर येथील संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानमध्ये बुधवारी (दि. १) रात्री साडेआठच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत मंदिर परिसरातील मोठे नुकसान झाले असले तरी विठ्ठल-रुख्मिणीच्या देवमूर्ती सुरक्षित राहिल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी हभप प्रसाद महाराज यांच्या नेतृत्वाखाली संत सखाराम महाराजांची दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान केली होती. रात्री सीसीटीव्ही यंत्रणेत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे मंदिराच्या वरच्या मजल्यावरील बैठक खोलीला आग लागली. संपूर्ण लाकडी बांधकाम आणि ऑईल पेंटमुळे आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर, पारोळा तसेच परिसरातील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. नागरिक, स्वयंसेवक आणि विविध संस्थांच्या सहकार्याने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून चोपडा, शिरपूर आणि पारोळा येथूनही अग्निशमन वाहने व पाण्याचे टँकर मागविण्यात आले. अमळनेर शहर पत्रकार संघानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून खाजगी टँकरधारकांना मदतीचे आवाहन केले.
दरम्यान, माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पूर्वी बोरी नदीकाठावरील रस्ता विकसित केल्यामुळे अग्निशमन बंबांना घटनास्थळी पोहोचणे शक्य झाले. सराफ बाजारातील अरुंद रस्त्यांमधून अग्निशमन वाहने पोहोचणे अवघड असल्याने या पर्यायी मार्गाचा मोठा उपयोग झाल्याची चर्चा होती.
आगीची माहिती मिळाल्यानंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे, पारोळ्याचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्यासह प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मोठी गर्दी झाल्याने सुरुवातीला अडचणी निर्माण झाल्या; मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
मंदिराला आग लागल्याची माहिती मिळूनही हभप प्रसाद महाराज यांनी दिंडी अर्धवट सोडून माघारी न फिरता पंढरपूरकडे प्रवास सुरूच ठेवला. “आधी पांडुरंग” या भावनेतून त्यांनी दिंडी अखंड सुरू ठेवत भक्तीला प्राधान्य दिल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली.
या दुर्घटनेनंतर नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक आणि युवकांनी एकजुटीने मदतकार्य करत ऐक्याचे दर्शन घडविले.