DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पोलीस मुख्यालयात २,३२० झाडांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

जळगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दल आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (८ जुलै) जळगाव पोलीस मुख्यालयात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात तब्बल २,३२० झाडांची लागवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संवर्धन करणेही तितकेच आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

या उपक्रमात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सुमारे ५५० श्री सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. त्यांच्या श्रमदानातून पोलीस मुख्यालयाच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची नियोजनबद्ध पद्धतीने लागवड करण्यात आली. वृक्षारोपणासह पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि हरित परिसर निर्मितीचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपअधीक्षक (गृह शाखा) संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांच्यासह जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व श्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित करणारा हा उपक्रम सर्वांच्या सहभागातून यशस्वीरीत्या पार पडला.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.