DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

राज्यात अतिवृष्टी, आजही पावसाचा मोठा इशारा; पुढील २४ तास धोक्याचे

मुंबई : राज्यात गेल्या पाच ते सात दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर आता काहीसा कमी होताना दिसत असला, तरी भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्हा आणि पुणे घाटमाथा परिसरासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर मुंबईसह काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.

जून महिन्यात अपेक्षित असलेला पाऊस १ ते ६ जुलैदरम्यानच मोठ्या प्रमाणात कोसळला. नाशिकसाठी ढगफुटीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, हवामानातील बदलामुळे पावसाचे ढग पालघर व गुजरातच्या दिशेने सरकले.

गेल्या सात-आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. धरणातून सुमारे २७ हजार क्युसेक वेगाने मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला असून, एकता नगर सोसायटीसह काही भागांत पाणी शिरले आहे. प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. पुण्यातील भिडे पूलही पाण्याखाली गेला आहे.

मुंबईत रात्री जोरदार पाऊस झाला असला तरी बुधवारी सकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतली. वरळीसह काही सखल भागांमध्ये पाणी साचले होते. रस्ते वाहतूक सुरळीत असून मध्य रेल्वे सुमारे पाच मिनिटे, तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सुमारे दहा मिनिटे उशिराने सुरू आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रायगड, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर तसेच घाटमाथ्याच्या भागात पुढील २४ तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागांमध्येही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, गुजरातमार्गे नैऋत्य मान्सूनची पुढील वाटचाल सुरू असून, येत्या दोन ते तीन दिवसांत तो हरियाणा, पंजाब आणि राजस्थानपर्यंत पोहोचून संपूर्ण देश व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांत पुढील काही दिवसांत पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.